मुंबई- आज येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईसह कोकणात पाऊस जोर धरू लागला आहे आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली, त्यासोबतच अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामची सुरुवात झाली आहे. यासोबतच हवामान खात्याने येत्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.मुंबईच्या लालबाग, परळ, दादर, माहीम भागात सकाळपासून पावसाने बरसायला सुरुवात केली. वसई-विरारपासून चर्चगेटपर्यंत पाऊस बरसत आहे.
रत्नागिरीत जोरदार पाऊस
रत्नागिरीत जोरदार पाऊस पाहायला मिळाला. पावसामुळे नदी-नाले वाहू लागले आहेत. अचानक पाणी वाढल्याने नदीपात्रात पार्क केलेली वाहने अडकून पडली. राजपुरातील कोदावली नदीपात्रात काल संध्याकाळी दोन गाड्या अडकल्या. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने गाड्या अडकल्या. अखेर नागरिकांच्या प्रयत्नामुळे अडकलेल्या गाड्या काढण्यात यश आलं.
सिंधुदुर्गातही पावसाची जोरदार हजेरी
येथील सावडाव धबधबा प्रवाहित झाला आहे. आज सकाळपासून पाऊस सुरुच आहे. पण काल रात्रभर पाऊस संततधार कोसळत होता. या पावसाने सर्वांच्या प्रतीक्षेत असलेला कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा सकाळपासून प्रवाहित झाला आहे. आंबोली नंतर सावडाव धबधबा पर्यटकांची पसंती आहे.
कल्याणलाही पावसाने झोडपले
काल संध्याकाळपासून कल्याणमध्ये पावसाची सुरुवात झाली. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कल्याणच्या चिकलघर परिसरात पाणी साचले. त्यामुळे नालेसफाईची पहिल्याच पावसात पोलखोल झाली.
शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे लाईट गेली. काल सायंकाळी 6 वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे. महत्वाचं म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
बुलडाणा
जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस आला. संग्रामपूर, बुलडाणा, शेगांवसह इतर ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
कराड
एकीकडे पाऊस होत असताना, साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा अतिसौम्य धक्का जाणवला. कोयनानगर परिसरात रात्री 9. 36 मिनीटांनी 2.4 रिक्टरर स्केलचा भूकंपाचा अतिसौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचं केंद्रबिंदू कोयना धरणापासून 9.6 किलोमीटर अंतरावर कोडोली गावच्या नैऋत्य दिशेला 3 किलोमीटर अंतरावर जमिनीत खोली 7.0 कि. मी होती. कोयना धरण व्यवस्थापनाने याबाबतची माहिती दिली.