मॉस्को – करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दिल्ली आणि गोव्यामध्ये अडकून पडलेल्या शेकडो रशियन पर्यटकांना आज रशियाने मायदेशी परत नेले. एरोफ्लोट विमान मंगळवारी 340 पर्यटकांना घेऊन नवी दिल्लीहून मॉस्कोला रवाना झाले. याशिवाय मॉस्कोवरून गोव्यातील पर्यटकांच्या सुटकेसाठीही विशेष विमान पाठवले असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे भारताने आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्णपणे थांबवली आहे. त्यामुळे दिल्लीसह गोवा, उत्तर प्रदेशातील वृंदावन, उत्तराखंडमधील ऋषिकेश या भागांमध्ये अडकून पडले होते. त्यांच्या सुटकेसाठी रशियाच्या दुतावासाकडून भारत सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर या विशेष विमानांच्या आगमनाला परवानगी देण्यात आली. दरम्यान रशियन दुतावासाकडे संपर्क साधण्याचे आवाहन रशियाच्या नागरिकांना करण्यात आले होते. इजिप्त आणि लॅटिन अमेरिकेतील नागरिकांची मायदेशी रवानगी करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.