पुणे : केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि संकुचित वृत्तीमुळे ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले असून, ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत व्हावे, यासाठी आणि ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच, केंद्र सरकारने राज्याला इम्पेरिकल डेटा न दिल्यास दिल्लीतील जंतरमंतर, संसद भवन तसेच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा या वेळी देण्यात आला.
केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणांमुळे ओबीसी समाजाला आरक्षण गमवावे लागले आहे. आज राज्यातील भाजप नेते ओबीसी आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारला जबाबदार धरून स्वत:च्या पक्षाची चूक लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारला इम्पेरिकल डेटा देण्याची आवश्यकता असताना राज्याची ही मागणी केंद्रातील मोदी सरकार मान्य करीत नाही. उलट, राज्यातील भाजप नेतेही केंद्राचीच री ओढताना दिसत आहेत. एकीकडे ओबीसींचे आरक्षण रद्द करायचे आणि दुसरीकडे ओबीसींप्रति कळवळा दाखवायचा, ही खेळी भाजपकडून खेळण्यात येत आहे. परंतु, राज्यातील जनतेने ही खेळी ओळखली आहे.
ओबीसी समाजाचे आरक्षण कायम राहावे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे, ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनीच राज्यात सर्वप्रथम मंडल आयोग लागू केला होता. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हे, तर लोकसभा व विधानसभेतही ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणले. त्या वेळी ‘मंडल विरुद्ध कमंडल’ अशी भूमिका घेणाऱ्या भाजपने पुन्हा एकदा ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा डाव खेळला आहे.
केंद्र सरकार आणि भाजपच्या या भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व ओबीसी सेलचे पुणे अध्यक्ष संतोष नागरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी सत्संग मार्गाने कीर्तन करून केंद्र सरकारला सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना केली. तसेच, केंद्र सरकारने राज्याला इम्पेरिकल डेटा न दिल्यास दिल्लीतील जंतरमंतर, संसद भवन तसेच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा या वेळी देण्यात आला.
या वेळी पक्षाचे रवींद्र माळवदकर, प्रदीप देशमुख, महेश हांडे, योगेश ससाणे, अझिम गुडाकुवाला, भोलासिंह अरोरा, शिवदास उबाळे, हरीश लडकत, प्रशांत कुदळे, ओमकार भोजने, गणेश ससाणे, रुपेश आखाडे, गोविंद पवार, बाबा ढेबे, मिलिंद बालवडकर यांच्यासह विधानसभाध्यक्ष नितीन कदम, आनंद सवाने, गणेश नलावडे, फहीम शेख, दिलीप आरोंदेकर, गौरव कापरे, मंगेश फुदे, साहिल तांबोळी, किसन काळे, समता परिषदेचे प्रदीप हुमे, पंढरीनाथ बनकर, राजश्री भगत, राखी श्रीराव, श्रीमती उबाळे, शालिनी भोजने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

