पुणे :
लोकांची खरेदी करण्याची क्षमता दुबळी झाली तर अर्थव्यवस्था संकटात येते. नोटाबंदीनंतर लोकांच्या खरेदी करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाल्याने आज देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे शहरातील व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले.
ते म्हणाले, केंद्रातील सरकारने गेल्या दोन-अडीच वर्षात अर्थव्यवस्थेबाबत इतक्या टोकाच्या भूमिका घेतल्या आहेत की त्यामुळे उद्योजक, व्यापारी आणि नागरिक अशा सगळ्याच घटकांवर त्याचा परिणाम झाला आहे. अनेक उद्योगांमध्ये नोकर आणि कामगार कपात करावी लागली. अनेकांच्या समोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. नोटाबंदीमुळे ब्लॅकमनी संपुष्टात येणार असेल तर हा निर्णय योग्य ठरला असता. पण नोटाबंदीमुळे देशातील ८० टक्के चलन निघून गेल्यानंतर योग्य पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे या निर्णयाचे विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. उद्योग-व्यवसायातील सगळ्याच क्षेत्रांमध्ये अस्वस्थता आहे.
ऑपरेशननंतर रुग्णांची योग्य ती काळजी घेण्याची व्यवस्था न केल्याने पेशंट दगावला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरे तर धनिकांचा सगळा काळा पैसा स्विर्त्झलंडमधील बँकांमध्ये आहे. या बँकां गुप्ततेचे धोरण सोडत नाहीत. आता बाहेरचा काळा पैसा आणता येत नाही म्हणून मग काहीतरी केले असे दाखवण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली.
श्री. पवार म्हणाले, राजकारणापेक्षा मला देशाच्या अर्थकारणात, शेती आणि उद्योगात अधिक रस आहे. त्यामुळे कायम व्यापारी वर्गाशी संपर्क राहिल. देशाच्या विकासातील त्यांचे योगदान अधिक अर्थपूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
ते म्हणाले, महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील तीन मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. सुशिक्षित लोकांनी भाजपच्या विरोधात कौल दिला आहे. या निकालाकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहतो.
फत्तेचंद रांका म्हणाले, पवारसाहेबांनी व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. देशाच्या पंतप्रधानांकडून व्यापाऱ्यांचा उल्लेख चोर म्हणून केला जातो ही खेदाची बाब आहे. नोटाबंदी हा हुकूमशाहीतून आलेला निर्णय आहे काय, असा प्रश्न पडतो. त्यामुळे आता महाराष्ट्रात रामराज्य कधी येईल याची वाट पहात आहे.
बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा, खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, पक्षाच्या व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजेश फुलपागर, जैन ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष विजय भंडारी, महेश सहकारी बँकेचे अध्यक्ष पूनमचंद धूत, दिलबागसिंग, लक्ष्मीकांत खाबिया, अशोक राठी आदी उपस्थित होते.