विघ्नहर्ता श्रीगणेशाचा सार्वजनिक उत्सव सोमवारी (दि. 5 सप्टेंबरला) सुरु होत आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध सर्वांना लागलेले आहेत. जनजागरण आणि विधायक लोककार्यांसाठी सुरु झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्रात एक वेगळी परंपरा आहे. या परंपरेचे पाईक म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची आयोजनासाठी लगबग सुरु झाली आहे. कोणत्याही सार्वजनिक उत्सवात संभाव्य अपघात किंवा विघ्न टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची प्राथमिक जबाबदारी आयोजकांवर असते. यातील प्रमुख जबाबदारी आहे ती वीजअपघाताचे विघ्न टाळण्याचे.
वीज दिसत नाही मात्र, तिचे परिणाम भयावह असतात. जीवघेणे असतात. त्यामुळे विजेपासून सर्वांना सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजनांना सर्वाधिक प्राथमिकता देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वीजपुरवठा घेतला जातो. पण हा वीजपुरवठा अधिकृतपणे तात्पुरत्या वीजजोडणीतून घेणे हे सर्व सार्वजनिक मंडळांचे आद्यकर्तव्य आहे. कारण पथदिव्यांवरून, घरातून किंवा आकडे टाकून घेण्यात येणारा अनधिकृत वीजपुरवठा हा कोणत्याही क्षणी कोणत्याही अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी वीजपुरवठा करण्यासाठी विजेचे दर घरगुतीपेक्षाही कमी म्हणजे प्रतियुनिट 3 रुपये 71 पैसे अधिक इंधन अधिभार असे आहेत. आयोजकांनी अशा उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, हा कमी दर ठेवण्यामागील हेतू आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अधिकृत वीजपुरवठा घेण्यास सार्वजनिक मंडळांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे. इतर बाबींसाठी थोडाफार खर्च कमीअधिक करता येईल, पण वीजपुरवठ्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येत भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा योग्य आणि अपघातविरहित असणे आवश्यक आहे. गणेशोत्सवातील मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीजकंत्राटदारांकडूनच करून घेतली पाहिजे. गणेशोत्सवात विविध कामांसाठी करण्यात येणारी वायरिंग ही योग्य तसेच दोष, धोकाविरहीत असणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी विजेचे वायर्स विस्कळीत स्वरुपात राहणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली पाहिजे.
सर्वात महत्वाचे म्हणजे वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. केवळ कमी खर्चाच्या हेतुने विजेचा भार सहन करू शकत नसणार्या तकलादू वायर्स वापरल्यास शार्टसर्किट किंवा वायर्स जळून आग लागण्याची शक्यता मोठी असते. याशिवाय गणेशोत्सवात पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या पण टेपने जोडलेल्या असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते.
गणेशोत्सवाच्या काळात वीजतारा जळणे, शार्टसर्किट होणे किंवा वीजव्यवस्थेत बिघाड होणे आदी संभाव्य शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांनी, कार्यकर्त्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे तक्रार निवारण केंद्ग, कक्ष अभियंता, उपविभागीय अभियंता किंवा कार्यकारी अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवणे आवश्यक आहे. तसेच वीजपुरवठ्यासाठी तात्पुरत्या वीजमीटरची पेटी पाण्यापासून सुरक्षित राहील अशा ठिकाणी ठेवावी. या पेटीच्या देखभालीसाठी एखाद्या स्वयंसेवकाची नियुक्ती करता येईल. सार्वजनिक ठिकाणी देखावे तयार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा या देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करण्यास प्राथमिकता दिली पाहिजे.
अनेक सार्वजनिक मंडळे जनरेटर्सचा वापर करतात. परंतु, वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी एकच न्यूट्रल घेतला जातो. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु करण्यात येतो. परंतु, एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा व जनरेटरचे न्यूट्रल हे स्वतंत्र असण्याची काळजी सार्वजनिक मंडळांनी घेणे अत्यावश्यक आहे. श्रीगणेशाला निरोप देण्यासाठी मिरवणूक काढली जाते. परंतु, यादरम्यान आजूबाजूला असलेल्या उच्च व लघुदाब वाहिन्या मिरवणुकीतील वाहने, देखावे आदींपासून सुरक्षित राहतील, याची काळजी घेतली पाहिजे.
तातडीच्या मदतीसाठी गरज भासल्यास मंडळाच्या पदाधिकार्यांनी, कार्यकर्त्यांनी महावितरणच्या 24 तास सुरु असणार्या टोल फ्री क्रमांक 1912, 18002003435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा.
जाणते, अजाणतेपणाने केलेल्या चुका या वीजअपघातांसाठी क्षम्य ठरत नाहीत. कोणत्याही चुकीसाठी वीज क्षमा करीत नाही. त्यामुळे वीजपुरवठा घेताना सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांना प्राथमिकता देणे अतिशय गरजेचे आहे. महावितरण कंपनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना त्वरीत तात्पुरती वीजजोडणी देण्यासाठी सज्ज आहे. अनामत रकमेतून वीजवापराच्या रकमेशिवाय उर्वरित रक्कम संबंधीत सार्वजनिक मंडळांना त्वरित परत करण्यात येणार आहे. महावितरणचे अभियंते, जनमित्र आवश्यक तेथे या मंडळांना वीजवहन व्यवस्थेसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत. गणेशोत्सवासाठी विविध उपाययोजना करताना सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि अधिकृत वीजकंत्राटदारांकडूनच दर्जेदार वीजवहन व्यवस्था करून घेतली पाहिजे.
– निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण कंपनी, पुणे

