आकुर्डी येथे रॉनी इलेव्हेटर्सचे पश्चिम महाराष्ट्रातील विभागीय मुख्यालयाचे उद्घाटन
पिंपरी, पुणे-शहरे वेगाने विकसित होत असताना शहरांमध्ये घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. घरांच्या वाढत्या मागणीचा आणि उपलब्ध असणाऱ्या जागेच्या मर्यादा विचारात घेऊन शासन उंच इमारतींना परवानगी देत आहे. टीडीआर, एफएसआय वाढवून मिळाला तर विकसक उंच इमारतींचे प्रकल्प करतात. तेथे उद्वाहन (लिफ्ट) उभारल्या जातात. या लिफ्टचे अपघाताचे प्रमाण शून्य टक्क्यांवर येणे आवश्यक आहे. यासाठी रॉनी इलेव्हेटर प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक रोहन देशपांडे आणि विभागीय संचालक जितेंद्र रानवडे यांनी संघटनेच्या वतीने काम करावे, असे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले.
आकुर्डी, जय गणेश व्हिजन येथील रॉनी इलेव्हेटर्स प्रा. लि. या कंपनीच्या पश्चिम महाराष्ट्रातील विभागीय मुख्यालयाचे उद्घाटन आणि कंपनीच्या माहिती पुस्तकाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२५) आमदार मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रॉनी इलेव्हेटर प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक रोहन देशपांडे आणि विभागीय संचालक जितेंद्र रानवडे, लिफ्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष गणपत फुलारी, इंडिया सिक्युरिटी प्रेस युनियन नाशिकचे माजी उपाध्यक्ष जयंत देशपांडे, उद्योजक कैलास ठाकूर तसेच पुणे जिल्ह्यातील विविध व्यावसायिक, उद्योजक, मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.
आ. शंकर मांडेकर यांनी सांगितले की, मराठी युवकांनी व्होकल फॉर लोकल चा अवलंब करीत ही कंपनी सुरु केली आहे. यामुळे स्थानिक पातळीवर मराठी युवकांना रोजगार उपलब्ध होईल, ही समाधानाची बाब आहे. उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून संभाव्य अपघाताचे प्रमाण शून्य टक्के रहावे यासाठी लक्ष दिले पाहिजे. या असोसिएशनच्या माध्यमातून विक्री पश्चात सेवा देण्यासाठी स्कील इंडिया अंतर्गत प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. यामुळे लिफ्ट क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण, रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आ. मांडेकर यांनी सांगितले.
स्वागत, प्रास्ताविक रोहन देशपांडे, आभार जितेंद्र रानवडे यांनी मानले.

