पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोमवारी दिला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास त्यांनी केलेला स्पष्ट विरोध यामागे कारणीभूत असल्याचे स्पष्ट होणार आहे . प्रशांत जगताप पुढे काय करणार याबाबत अद्याप स्पष्टता नसून ते काँग्रेसमध्ये जातील, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.याबाबत प्रत्यक्षात कालपासून प्रशांत जगताप यांच्या शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही .दत्ता धनकवडे यांनी काल प्रशांत जगताप शहराचे अध्यक्ष आहेत पण त्यांच्याही वर सुप्रिया सुळे , शरद पवार असे नेते असल्याने त्यांनी राष्टवादी अजित पवार गटाशी युतीचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते . यामुळे आता महाविकास आघाडीचा तिढा वाढला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी जर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सामील झाली तर कॉंग्रेस , आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका हि बदलू शकणार आहे.
दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत समिती गठित करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून या समितीत माजी माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा या समितीत प्रवेश आहे. या समितीतून जगताप यांना वगळण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जगताप यांची त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक पार पडली असून त्यामध्ये राजीनामा देण्याचे निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुळे यांच्याकडे राजीनामा देण्यात आल्याचे वृत्त पसरले आहे.
ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली त्यानंतर मी पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा नव्याने बांधली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढली तर शरद पवार गटाला फायदा होईल. याउलट आपण अजित पवारांसोबत लढल्यास आपल्या पक्षाला तोटा होईल. तसेच निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अजित पवार यांच्याशी युती करुन कार्यकर्त्यांचे मरण होत असेल तर मी पक्षातून बाहेर पडतो. मी अजून राजीनामा दिलेला नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी फक्त शहर अध्यक्षपदाचा नव्हे तर शरद पवार गटाच्या सदस्यत्त्वाचाही राजीनामा देईन, असे प्रशांत जगताप यांनी यापूर्वीच सांगितले होते . त्यामुळे आता आज यावर तोडगा निघणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना जगताप यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त ,विशाल तांबे आणि दत्ता धनकवडे या दोहोंनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे पसरले असण्याचीही शक्यता वर्तविली जाते आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई प्रदेशची दुपारी 12 वाजता बैठक आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्षा राखी जाधव, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या वतीने आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेऊन आपला निर्णय ठाकरेंना आजच पक्षाच्यावतीने कळविण्यात येईल. अद्याप दोन्ही पक्षात बोलणी सुरू असून चर्चेतून योग्य मार्ग निघेल असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आहे.

