कोल्हापूर, 17 एप्रिल 2023
जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने 18 एप्रिल रोजी केंद्रीय संचार ब्युरो कोल्हापूर आणि पन्हाळा विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा किल्ला येथे गडभ्रमंती, गड परिसराची स्वच्छता, गड-किल्ले संवर्धनाची शपथ तसेच तज्ञांचे मार्गदर्शन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी पन्हाळा नगरपरिषद तसेच पन्हाळा पंचायत समितीचे विशेष सहकार्य लाभले आहे. उद्या 18 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता ऐतिहासिक ताराराणी वाड्यामध्ये स्थित असलेल्या पन्हाळा विद्यामंदिर शाळेच्या परिसरातून या कार्यक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या गडभ्रमंतीची सुरुवात होईल. त्यानंतर पुढील कार्यक्रम घेण्यात येतील. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक मीना पोतदार यांचे व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षी 18 एप्रिल हा ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके यांच्या जतनासाठी जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो.
पन्हाळ्याची पार्श्वभूमी
हा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे. शिवाजी महाराजांची आठवण करूण देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासीक किल्ला आहे. येथे आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. ह्या गडाच्या आत मध्ये संभाजी मंदीर, सोमेश्वर मंदीर, तीन दरवाजा, राज दिंडी ई. आहेत. हा किल्ला कोल्हापूरच्या उत्तरेला 20 कि.मी. अंतरावर आहे, हा गड सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये येतो, हा किल्ला जमीन सपाटीपासून 400 मी. उंचीवर येतो.सामरिक दृष्टीने पन्हाळा गडाला महत्वाचे स्थान आहे.

