पुणे- अयोध्या येथील विवादित रामजन्मभूमी-बाबरी मस्जिदची 2.77 एकर जागा व केंद्र सरकारद्वारा अधिग्रहण केलेल्या 67 एकर जागेत म्हणजेच रामजन्मभूमीच्या मूळ जागेत प्रभू श्रीरामाचे भव्य आणि सुंदर मंदिर निर्माण करावे. त्याच बरोबर विश्व शांती केंद्र, आळंदीतर्फे प्रस्तावित विश्वधर्मी श्रीराम मानवता भवनाच्या उभारणी संदर्भात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती श्रीराम जन्म भूमीचे पक्षकार व अयोध्या येथील निर्मोही आखाडाचे प्रमुख महंत रामदास यांनी एमआयटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महंत रामदास यांनी सांगितले की, संपूर्ण भारताच्या हितासाठी, समाज आणि मानव कल्याणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे कि येथे विश्र्व शांती केंद्र, आळंदी व एमआयटी विश्व शांती विद्यापीठाद्वारे प्रस्तावित विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन ही संकल्पना साकार करावी. विवादास्पद जागेशी सलग्नित 67 एकर जागेवर भारत सरकारद्वारे येथे विशाल मंदिर निर्माण करावे. तसेच, भारतातील अन्य धर्मांची प्रार्थनास्थळे येथे उभारावीत. त्याच प्रमाणे 15-20 एकर जागेवर प्रभु श्रीरामचंद्र यांचे अतिभव्य मंदिराचे निर्माण करावे. तसेच, प्रत्येक धर्माच्या प्रार्थनास्थळासाठी कमीत कमी 5-6 एकर जमीन उपलब्ध करुन द्यावी. त्यामुळे संपूर्ण जगात भारताची नवी ओळख निर्माण होईल. तसेच सांप्रदायिक सदभाव आणि विश्वबंधुत्वासाठी भारत विश्वगुरू म्हणून उदयास येईल.
हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्यामुळे अयोध्या शहराचा योग्य विकास झालेला नाही. येथे चांगले रस्ते, पर्यटनाची सुविधा, आंतरराष्ट्रीय एयरपोर्टची सुविधा नाही. त्यामुळे वरील जागेत विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन ही संकल्पना साकार झाल्यास या शहराचा संपूर्ण विकास होईल.
विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांनी सांगितले की, देशाच्या विकासासाठी या समस्येचे निराकरण होणे महत्त्वाचे आहे .त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे सूचित केले की, हा विषय न्यायालयाच्या बाहेर राहून, आपापसात चर्चा करुन सर्वसहमतीने निकालात काढावा. असे करणे हे देशाच्या हितासाठी योग्य ठरेल . याच सूचनेचे पालन करुन आम्ही सर्व आणि एमआयटी विश्व शांती विद्यापीठाच्या माध्यमातून हे निवेदन केले आहे.
नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन.पठाण यांनी सांगितले की, इस्लाम धर्मात असे सांगितले आहे की, विवादास्पद भागात प्रार्थनास्थळाची उभारणी करु नये. त्यामुळे या जागेवर श्रीराम मानवता भवनाची निर्मिती व्हावी. तसेच, स्वामी विवेकांनद यांच्या शिकवणुकीला अनुसरुन सर्वांनी प्रेमाने एकत्रित आल्यास भारत हा विश्व गुरू म्हणून उदयास येईल.
या पत्रकार परिषदेत अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी विषयाचे पक्षकार व अखिल भारतीय श्रीपंच रामनंदीय निर्वाण अनी आखाडा हनुमानगढीचे प्रमुख महंत धर्मदास, स्वामी विद्याचलदास, योगीराज स्वामी व झुनझुनवाला शिक्षण संस्थेचे गिरीजेश त्रिपाठी उपस्थित होते.

