अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे शुभहस्ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले. या प्रसंगी बोलताना भाषा हि सशक्त आणि वृद्धींगत होणारी हवी. भाषेवर समाज, संस्कृती टिकून असते. भाषेचा सामाजिक व संसारिक क्रियांशी व संकेताशी संबंध आहे. समाजाला समाजपण देणारी व समाजाला आपुलकीच्या प्रेमाने बांधून ठेवणारी एकमेव शक्ती म्हणजे भाषा होय. इंग्रजीचे ज्ञान प्राप्त करताना आपणास मराठीचा विसर पडायला नको असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मराठी भाषेचा विकास व प्रसाराला चालना मिळावी म्हणून विद्यार्थी विकास मंडळ व ग्रंथालय विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा, मराठी भाषेवर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा, मराठी स्वाक्षरी मोहीम अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ग्रंथपाल प्रा. तानाजी माळी यांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेतील पुस्तके वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी डिजीटल ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील दर्जेदार पुस्तके वाचनासाठी पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून दिली. वृत्तपत्रातील विविध कात्रणे प्रदर्षित करून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी चालेल्या प्रयत्नांची जाणीव उपस्थिताना करून दिली. विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा.गणेश कोंढाळकर यांनी प्राचीन काळातील मराठी भाषेची उत्पत्ती, तीचा विकास याबद्दल अधिक माहिती सांगून मराठी भाषेचा दैनंदिन जीवनातील वापर व महत्व सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड, प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा.गणेश कोंढाळकर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिकक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रा.गणेश कोंढाळकर व प्रा.तानाजी माळी यांनी केले. हा सोहळा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टसिंगचे नियम पळून पार पडला.

