मुंबई-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहे. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आज दुपारी महायुतीमधील नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे शपथविधी होणार आहे.
देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. वर्षावर एकनाथ शिंदेसोबत ते चर्चा करत असून काही वेळाने हे नेते राज्यपालांकडे जातील.देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर दुपारी 2 वाजता महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचीम्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांची बैठक होणार आहे. महायुतीची ही पहिलीच अधिकृत बैठक असेल. या बैठकीत मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला अंतिम स्वरूप देण्यात येईल. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता हे तिन्ही नेते एका शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर करतील.