कोल्हापूर-काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून देशात अराजकता पसरवण्याचे काम होत असल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो या समुहातील अनेक संघटना अतिशय टोकाच्या डाव्या विचारांच्या आहेत. त्यांची ध्येय धोरणे पाहिली, त्यांची कामाची पद्धत पाहिली तर त्या अराजकता पसरवत असल्याचे स्पष्ट आहे, असे ते म्हणालेत.काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. ते बुधवारी दुपारी नागपुरात आयोजित संविधान सन्मान परिषदेला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6 वा. मुंबईतील बीकेसीमध्ये त्यांची महाविकास आघाडीसाठी जाहीर सभा होणार आहे. या सभेत महाविकास आघाडीचा निवडणूक जाहिरनामाही प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर देशात शहरी नक्षलवाद पसरवण्याचा आरोप केला आहे.
देवेंद्र फडणवीस बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, भारत जोडो समुहातील अनेक संघटना अतिशय टोकाच्या डाव्या विचारांच्या आहेत. त्यांची ध्येय धोरणे पाहिली, त्यांची कामाची पद्धत पाहिली, तर त्या अराजक पसरवणाऱ्या संघटना असल्याचे स्पष्ट होते. त्याला अराजकतावादी असेही म्हणता येईल.
एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. खरे म्हणजे संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधान का? तुम्ही लाल पुस्तक दाखवून कुणाला इशारा देत आहात? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर आणि अराजकतावादाचा अर्थ असतो डिसऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात. त्यामुळे संविधान व भारत जोडोच्या नावाखाली अराजकता पसवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजात विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचे काम याठिकाणी होत आहे. अर्बन नक्षलवाद हा यापेक्षा वेगळा नाही.
अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की, लोकांची मने प्रदूषित व कलुषित करायची. त्यांच्यामध्ये अराजकतेचे रोपण करायचे. जेणेकरून देशातल्या ज्या संस्था आहेत, देशातल्या ज्या व्यवस्था आहे, त्याच्यावरून त्यांचा विश्वास उडेल आणि कुठेतरी या देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल. हीच अराजकता पसरवण्याचे काम राहुल गांधी यांच्यामुळे देशात होत आहे आणि मी त्याच्यावरच बोललो आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांच्यावर अर्बन नक्षलवादाचा प्रभाव असल्याचा आरोप केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षांचे नेते उपद्रवी व अर्बन नक्षलवाद्यांच्या ताब्यात सापडलेत. राहुल गांधींमध्ये आज फार थोड्या प्रमाणात काँग्रेसचा विचार उरला आहे. ते एका डाव्या विचारसरणीतून कट्टर डाव्या विचारसरणीच्या विचारधारेकडे वळले आहेत. ते मूळ निळ्या रंगातील संविधानाऐवजी लाल कव्हरचे संविधान लोकांना दाखवत आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ही आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करत आहेत, असे फडणवीस आपल्या मुलाखतीत म्हणाले होते.