अमनोरा येस फाउंडेशन आणि सहयोगी संस्थेच्या वतीने स्तन कर्करोग तपासणी शिबिर
पुणे : कर्करोगाच्या प्रकारांमध्ये महिलांमधील स्तनकर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. परंतु अनेक वेळा महिला त्याकडे दुर्लक्ष करतात त्यातही पोलीस महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यस्त दिनचर्येमुळे स्वतःकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे अमनोरा येस फाउंडेशन आणि सहयोगी संस्था यांच्या वतीने पोलीस मुख्यालयात कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०३ महिला पोलीस कर्मचाऱ्यांची स्तन कर्करोग तपासणी झाली.
बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून सर्वोपचार रुग्णालय, अमनोरा येस फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज, यु इ लाईफसायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, ससूनचे अधिक्षक डाॅ. यल्लप्पा जाधव, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त रंगनाथ उंडे, ससूनच्या शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. लता भोईर, सिटी ग्रुप चे उपाध्यक्ष विवेक कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
डॉ. एकनाथ पवार म्हणाले, पुण्यातील सर्व पोलीस महिला कर्मचाऱ्यांसाठी त्यांना कर्करोग तपासणी शिबिर राबविण्यात येत आहे. महिलांचे देखील चांगले सहकार्य या शिबिराला मिळत आहे. पोलीस मुख्यालयात झालेल्या शिबिरात मॅमोग्राफीसाठी ३९ तर ३ महिला पोलिसांना पुढील तपासणीसाठी सांगण्यात आले आहे. कर्करोगाबद्दल लवकर माहिती मिळाल्यास त्यावर उपचार करता येतात. त्यामुळे महिला पोलिसांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे.
डॉ. राजकुमार शिंदे म्हणाले, महिला अजूनही त्यांना काही त्रास होत असेल तर सांगत नाहीत परंतु महिलांनी पुढे येऊन ते सांगणे गरजेचे आहे. स्तन कर्करोग पूर्वतपासणी सर्व महिलांनी करून घेणे आवश्यक आहे.
विवेक कुलकर्णी म्हणाले, महिला पोलिसांना विनामूल्य कर्करोग तपासणीसाठी हेल्थ कार्ड देण्यात आले आहेत. यापूर्वी विविध ठिकाणी झालेल्या ५ शिबिरात २२५ महिला पोलिसांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२ महिला पोलिसांना मॅमोग्राफी तर १० जणींना सोनोग्राफी तपासणी सांगण्यात आली होती. पोलीस समाजाची काळजी घेतात त्यामुळे त्यांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे.
विवेक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.