श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे पुणे महानगरपालिकेतील स्वच्छ फाउंडेशनच्या ५१ महिला कर्मचार्यांचा सन्मान
पुणे : उच्चभ्रू सोसायटी किंवा कमर्शियल ठिकाणी स्वच्छता करताना कोणी पैसे दिले नाही म्हणून कचरा घ्यायचा नाही असे कर्मचार्यांनी करू नये. त्यांचा कचरा घेतल्यास नंतर त्यांना तुमच्या कष्टाची जाणीव होईल आणि ते पैसे देण्यास सुरवात करतील. शहर स्वच्छ ठेवण्याचे काम कष्टकरी महिला वर्गाकडून करण्यात येते. शहर स्वच्छ व सुंदर राहण्यामध्ये स्वच्छता कर्मचार्यांचे मोठे योगदान आहे, असे मत पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी व्यक्त केले.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात स्वच्छ कर्मचार्यांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर उपस्थित होते. यावेळी महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली. प्रवीण चोरबेले यांनी प्रास्ताविक करीत मंदिराविषयी माहिती सांगितली.


