२१ वी सदी की समस्याए और गांधी ‘ या विषयावर व्याख्यान
पुणे:महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त पुण्यात ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘२१ वी सदी की समस्याए और गांधी ‘ या विषयावर ज्येष्ठ अभ्यासक डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर (दिल्ली)यांचे व्याख्यान गांधी भवन येथे झाले. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी होते.एड. स्वप्नील तोंडे यांनी सूत्र संचालन केले. स्वामिनी पारखे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. उमेश ठाकूर यांनी स्वागत केले. रोहन गायकवाड यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. अन्वर राजन यांनी आभार मानले.
डॉ. उर्मिला सप्तर्षी,डॉॅ.प्रवीण सप्तर्षी, संजय आल्हाट, संदीप गव्हाणे, श्रीराम टेकाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर म्हणाले,’ पुण्यात विचार मंथन होते. म्हणून इथे यावेसे वाटते.गांधी एक व्यक्त नसून समाजाची आत्मा आहेत. बुद्ध, महावीर,विदुर, कबीर, गांधीजी हे सर्व मानवतेचे आत्मा आहेत. सर्व आत्मा हे परमात्मा बनू शकतात, तसे हे सर्व साधनेतून, विचारातून, कार्यातून परमात्मा झाले. ज्यांनी ज्यांनी मानवी समस्यांचा अभ्यास केला, त्यांच्याकडे आपल्याला वारंवार जावे लागते. त्यामुळे गांधीजींना संपविता येत नाही. गांधी समजून घेण्यासाठी त्यांनी ज्या समस्यांवर काम केले त्या समजून घेतल्या पाहिजे. गांधीजींवर टीका केली की मार्केट व्हॅल्यू वाढते कारण इतक्या परिपूर्ण व्यक्तीमधील काय कमतरता शोधून काढली, याची उत्सुकता तयार होते. गांधीजी हे नव्या सहस्त्रकाच्या आदर्शवादाच्या शोधात होते. हा आदर्शवाद त्यांनी नुसता मांडला नाही तर जगून दाखवला. संवादाने प्रश्न सुटतील हा मार्ग गांधीजींनी दाखवला आहे.
स्व – चिंतनाचा मार्ग आपण सोडता कामा नये. आपली विचार क्षमता दुसऱ्या शक्तीच्या ताब्यात देवून चालणार नाही. गांधीजी प्रमाणे सर्व भिंती, मर्यादा यांच्या पलीकडे जावून मानवतेसाठी कार्य करणारे ‘ गांधी जन ‘ हवे आहेत. मुक्ती मिळवून देणे हे धर्माचे काम आहे, मात्र वर्चस्ववाद करणे हे धर्माचे काम नाही.
वास्तव समजुन घेणे, त्यातील समस्यांवर उत्तरे शोधण्याची क्षमता प्रत्येकाकडे आहे, असे गांधीजी मानत. एकविसाव्या शतकात आपला निसर्गाशी संबंध तुटत चालला आहे. स्वार्थ, लालसा हे अर्थ व्यवस्थांच्या सर्व संकटांच्या मुळाशी आहे. हे गांधीजींनी आधीच सांगितले आहे. या शतकात मानवी विचार करण्याच्या क्षमता ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण सर्व विश्वस्त भावनेने वागले पाहिजे. फक्त भांडवलवाद जगाच्या समस्या सोडवू शकणार नाही.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’ गांधीजी हे अंतिम सत्य सांगून गेलेत असे नाही, मात्र गांधीजींचे बोट सोडले तर पृथ्वी निर्जीव होण्याकडे लवकर जावू. त्यामुळे युद्धाने, द्वेषाने प्रश्न सुटणार नाही. हे गांधी विचार पुढे नेण्यात सर्वांचे हित आहे.’
दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय आणि बिगर संसदीय राजकारण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे,अभ्यासक चैत्रा रेडकर, प्रा. सुरेंद्र जोंधळे सहभागी होणार आहेत. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी असतील.
खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव
गांधी सप्ताहानिमित्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह फिल्म फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.गांधी भवन मध्ये विविध चित्रपट जात आहेत.५ ऑक्टोबर रोजी ‘ कोर्ट ‘ हा चित्रपट दाखविण्यात आला. ६ ऑक्टोबर रोजी ‘द किड’ हा चित्रपट दाखविण्यात आला.दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम कॉम्रेड’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे.
महात्मा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शन मुख्य सभागृहात सप्ताहभर खुले असेल. गांधी भवन आवारात खादी प्रदर्शन,पुस्तक प्रदर्शन,इतर गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले आहेत.

