मुंबई: महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांना अवघी एकच जागा सोडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप–शिवसेना महायुतीत घटक पक्ष असतानाही रिपब्लिकन पक्षाला थेट उमेदवारी देण्यात कंजूषपणा करण्यात आला आहे. मात्र, या रिपब्लिकन पक्षाने मुंबईत १३ वॉर्डांत स्वबळावर उमेदवार उभे करीत भाजप आणि राकाँपा अजित पवार गटाला मोठे आव्हान दिले आहे.
महायुतीकडून शिवसेनेच्या कोट्यातील चेंबूर पांजरापोळ परिसरातील एकमेव जागा रिपाइंला सोडण्यात आली आहे. या ठिकाणी रिपाइंच्या कार्यकर्त्या प्रज्ञा सुनील सदाफुले या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. ही जागा सोडण्याचा दिलदारपणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवल्याचे स्पष्ट करीत भाजपला टोला लगावला आहे. रिपाइंने ३८ जागांवर उमेदवार फायनल केले होते, मात्र प्रत्यक्षात १३ जागा लढवत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरही रिपाइंच्या पदरात एकच जागा पडली आहे. त्यामुळे त्यांची निराशा झाली आहे.
या वॉर्डात भाजप, राकाँपाशी सामना
भाजपचे उमेदवार असलेल्या वॉर्ड ५४, ५९,६५,१०४, १८६ या पाच वॉर्डांत आणि राकाँपा अजित पवार गटाचे उमेदवार असलेल्या वॉर्ड ३८,३९,५९, ११९, १८८ वॉर्डात रिपाइंचे उमेदवार स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे मुंबईत शिवसेना-भाजप युती झाली असली तरी राकाँपा अजित पवार गट आणि रिपाइं उमेदवारांचा मित्रपक्षांबरोबरच सामना रंगताना दिसणार आहे.

