पिंपरी- पुण्यात गेल्यावर मी सांगेन आज पर्यंत कोणी कोणी कोणाकोणाला उमेदवारी दिली , एका आरोपीला त्यांनी पण परदेशी पळून जायला पासपोर्ट देऊन मदत केली ना . जरा डोकं खाजवा ना ..पण हे पुण्यातले विषय मी पुण्यात यावर बोलेल असे वक्तव्य पिंपरी चिंचवड येथे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. गुन्हेगारांना उमेदवारी वाटपाच्या प्रश्नावर ते बोलत होते .
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची शुक्रवारी पिंपरी चिंचवड शहरात झालेली पत्रकार परिषद म्हणजे या महानगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या विजयाची दमदार ललकारी ठरली.या पत्रकार परिषदेत अजितदादा पवार यांनी महानगरपालिकेतील गैरकारभारावर आसूड ओढले. पुराव्याचे कागद सादर केले.
अजितदादांनी यावेळी बोलताना, या शहराच्या विकासासाठी दिलेले योगदान सांगत हे शहर पुन्हा विकासाच्या वाटेवर गतिमान करण्याची जबर इच्छाशक्ती दाखवली. हे शहर माझं आहे. या शहाराशी माझे भावनीक नाते आहे. या शहरासाठी माझा जीव तुटतो, अशी भावनिक साद घालत त्यांनी शहरातील जनतेला, मी आहे ना?, असे सांगत आश्वस्त करुन राष्ट्रवादीला विजयाचे आवाहन केले. एकूणच या संपूर्ण पत्रकार परिषदेत अजितदादांची जबरदस्त फटकेबाजी आणि अत्यंत आत्मविश्वासपूर्ण देहबोली पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या विजयाची दमदार ललकारी ठरली.
प्रश्नोत्तरापूर्वी मनोगत व्यक्त करताना अजितदादांनी 2017 नंतर महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला. ते म्हणाले, खासदार म्हणून राजकीय जीवनाची सुरुवात करताना या शहराचे प्रतिनिधीत्व केले. माझी पाटी कोरी असून देखील त्यावेळी 35 वर्षांपूर्वी या शहराने भरभक्कम मताधिक्य दिले. त्याची जाणीव ठेवून या शहराच्या विकासाचे शिवधनुष्य पेलले. या शहरात माझ्या 25 वर्षांच्या काळात जी कामे झाली त्याच कामांच्या बळावर माझी कामाचा माणूस म्हणून ओळख झाली. या काळात या शहरात कार्यकर्त्यांची एक फळी उभी केली. ते करताना कोणाला विधानपरिषदेवर तर कोणाला स्टँडीग कमिटीवर अशी विविध ठिकाणी संधी दिली. अगदी काहींचा विरोध असतानाही. सारी जनता साक्षी आहे, की माझ्या कारकिर्दीत या शहरातील होणारी कामे दर्जेदार होत होती. ठेकेदारांची रिंग किंवा टँकर माफिया, खुदाई माफिया सारखे जनतेस नाडणारी गँग कधी तयार केली नाही. हिम्मत असेल तर विरोधकांनी समोर येवून या शहरातील विकासकामात माझे योगदान नाही, असे आव्हानच त्यांनी दिले.
2017 नंतर मात्र 1 किलोमिटरच्या रस्त्याला 80 कोटीचा खर्च दाखवण्यापासून ते प्रत्येक ठिक़ाणी टक्केवारीचे भ्रष्टाचाराचे राजकारण सुरु आहे. त्यात अगदी कचर्यातही घोटाळा करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. कुत्र्यांच्या नसबंदीवर लाखो रुपयांचा खर्च दाखवला तरी देखील या शहरात 20 हजार लोकांना कुत्री चावली. यांनी नसबंदीला 71 लाख खर्च केले तर कुत्र्याची पिलावळ मग आली कुठून? असे एकापाठोपाठ एक आसून ओडत अजितदादांनी टेंडर कशी बदलली जातात त्याचे पुरावे सादर केले. अजून खूप पुरावे असून तेही मांडणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी ठणकावले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 2017 नंतर झालेल्या गैरकारभाराचे वाभाडे काढतानाच त्यांनी अत्यंत दिलासादायी भावनिक शब्दांत देखील जनतेला आश्वस्त केले. ते म्हणाले, मी फक्त टिका करणारा नेता नाही. आत्ता यावेळी काय परिस्थिती पालिकेत आहे ते सांगितले. पुढील पत्रकार परिषदेत या शहराच्या विकासाचे व्हिजन मांडणार आहे.
आमच्या काळात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत अशी महानगरपालिका असा लौकिक आम्ही निर्माण केला. आमच्याच काळात देशातील बेस्ट सिटीचा पुरस्क़ार या शहराला मिळाला. सुमारे पाच हजार कोटींच्या ठेवी महापालिकेच्या होत्या. अशी आपली ही महामालिका नंतरच्या सत्ताधार्यांनी कर्जाच्या खाईत लोटल्याचे सांगून ही परिस्थिती आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही, असे ठामपणे सांगितले. पिंपरी चिंचवडची जनता या गैरकारभाराला वैतागली आहे. दडपशाहीचे राजकारण करण्याइतपत सत्तेचा माज पलिकडून सुरु आहे. हे चित्र बदलण्यासाठी, शहरातील सर्व जाती, धर्माच्या, विविध घटकांच्या लोकांना एकत्र घेवून त्यांच्या व्यापक हिताचा विचार करणारा कारभार केला जाईल. त्यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी फक्त साथ द्यावी. त्यांना आम्ही कामच करुन दाखवू. सडेतोड बोलता बोलता त्यांनी या शहरासाठी माझा जीव तुटतो असे सांगून या शहराशी असलेले भावनिक नाते दाखवून दिले.

