९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ
सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राची तसेच साताऱ्याची संस्कृती व परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मानस ठेवून ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून देश-विदेशातील साहित्यप्रेमी, व्यक्तींना साहित्य संमेलनाविषयी संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या संकेतस्थळाद्वारे ९९व्या साहित्य संमेलनाचे वेगळेपणही सर्वांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास साहित्य संमेनलाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा (www.abmsssatara.org) शुभारंभ आज (दि. १६) संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. जनता सहकारी बँक येथील साहित्य संमेलनाच्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा शाहुपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशन, सातारा यांच्या वतीने दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सातारा येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलन उत्तम आणि वेगळेपण जपणारे व्हावे या करीता सातारकरांना आवाहन करताना श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, जिल्ह्यातील सर्व सातारकरांनी एकत्र येऊन सर्व प्रकारच्या माध्यमातून सातारा येथे होत असलेले संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी हातभार लावावा. या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून साहित्य व संस्कृतीचा आनंद घ्यावा.
विनोद कुलकर्णी म्हणाले, संमेलनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जिल्हाचा देदिप्यमान इतिहास, भौगोलिक माहिती, जिल्ह्यातील वीरपुत्रांची ओळख तसेच आपल्या कार्याने जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध असून यांसह संमेलनाचे वेळापत्रक, संमेलनस्थळ, आमंत्रित पाहुणे, स्वागत समिती, उद्घाटन समारंभ, स्वागताध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा परिचय, मान्यवरांचे संदेश आणि संमेलनादरम्यान घडणाऱ्या घडामोडींची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर साताऱ्यात होणारे हे पहिले संमेलन असल्याने त्याचा प्रभावीपणे वापर करत तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही हे संमेलन यशस्वी करण्याचा मानस आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून संमेलनाच्या पारदर्शक कारभाराचेही दर्शन घडेल, असेही त्यांनी सूचित केले.
प्रास्ताविकात नंदकुमार सावंत म्हणाले, देश-परदेशातील मराठी बांधवांना सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सर्वांगीण माहिती उपलब्ध व्हावी तसेच डिजिटल स्वरूपात दस्तावेजीकरण व्हावे हा संकेतस्थळ निर्मितीचा उद्देश आहे.
मान्यवरांचे स्वागत विनोद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन सविता कारंजकर यांनी केले तर आभार मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत बेबले यांनी केले. संकेतस्थळ निर्मिती करणारे करणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधींचा सत्कार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

