नागपूर : महाराष्ट्र बटालियन आर्टिलरी एनसीसी, नागपूरच्या कॅडेट्सना विधान भवन येथे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विशेष मार्गदर्शन केले. यानिमित्ताने आयोजित प्रेरणादायी संवाद कार्यक्रमात डॉ. गोऱ्हे यांनी कॅडेट्सना आपल्या जीवनातील अनुभवांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी सांगितल्या. त्या काळात आपण राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता, असे सांगत ग्रामीण भागात केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख त्यांनी केला. महिलांचे कल्याण, वैद्यकीय तपासणी शिबिरे तसेच विविध जनजागृती उपक्रमांमधील सहभागामुळे समाजाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक झाली, असे त्यांनी नमूद केले. तरुण वयात सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि सेवाभाव अंगीकारणे हे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते, असेही त्यांनी अधोरेखित केले.
विद्यार्थी जीवनातील अनेक रंजक, प्रेरणादायी आणि शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध अनुभव त्यांनी कॅडेट्सना सांगितले. या संवादातून कॅडेट्सशी स्नेहपूर्ण व मुक्त विचारांची देवाणघेवाण झाली. अपयशातून शिकणे, सातत्य राखणे आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करणे या मूल्यांवर भर देत त्यांनी एनसीसीमधून मिळणारी शिस्त, देशभक्ती, नेतृत्वगुण आणि सामाजिक सेवाभाव आयुष्यभर उपयोगी पडतो, असे सांगितले.
या कार्यक्रमाला लेफ्टनंट कर्नल अमेय कानडे (कमांडिंग ऑफिसर), विनोद राऊत (ब्युरो चीफ, सकाळ वृत्तपत्र) तसेच एनसीसी पीआय स्टाफ उपस्थित होता. विधानपरिषद उपसभापती कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते.
हा संवाद कार्यक्रम कॅडेट्ससाठी अत्यंत प्रेरणादायी व प्रबोधनात्मक ठरला. समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देण्याची, राष्ट्राचे जबाबदार नागरिक बनण्याची आणि भावी नेतृत्व घडवण्याची प्रेरणा या संवादातून कॅडेट्सना मिळाली.

