जेफ्री एपस्टीन:एक श्रीमंत वित्त व्यवस्थापक ज्याचेवर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे गंभीर आरोप
जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील एक श्रीमंत वित्त व्यवस्थापक (फायनान्सर) होता. तो अतिशय श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांचे पैसे गुंतवण्याचे काम करत होता. न्यूयॉर्क, फ्लोरिडा आणि स्वतःच्या खासगी बेटावर तो मोठ्या लोकांशी मैत्री ठेवत असे. मात्र, याच काळात त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे गंभीर आरोप झाले.
अमेरिकेतील कुख्यात उद्योजक जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे उघड करण्यासाठी अमेरिकेच्या न्याय विभागाला 19 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. ‘एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’अंतर्गत (Epstein Files Transparency Act) होणाऱ्या या खुलाशांकडे जगाचे लक्ष असताना, भारताशी संबंधित काही संदर्भ समोर आल्याने देशांतर्गत चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एपस्टीन फाईलमुळे भारतात राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं आहे. इतकेच नव्हे, तर मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो असाही दावा केला जात असल्याने एपस्टीन फाईलकडे देशाचे लक्ष लागून राहिलं आहे. अर्थात भाजपकडून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील चर्चा फेटाळून लावली असली, तरी त्यांच्याकडून सातत्याने दावा केला जात आहे.
दुसरीकडे, एपस्टीन प्रकरणात आता आणखी फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये डोनाल्ड ट्रम्प अनेक महिलांसोबत दिसून येत आहेत. मात्र, यामध्ये एकही अल्पवयीन मुलगी नाही. त्यांच्यासह बिल गेट्स आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्विंटन यांचेही फोटोही समोर आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली आहे.
मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीतून भारत सरकार किंवा कोणत्याही भारतीय अधिकाऱ्यांवर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप सिद्ध करणारे ठोस पुरावे आढळलेले नाहीत.दरम्यान, नवीन उघड झालेल्या ई-मेल्समध्ये 2019 साली एपस्टीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Epstein Email), अमेरिकन राजकीय रणनीतीकार स्टीव्ह बॅनन यांच्याशी भेट घडवून आणण्याचे प्रयत्न झाल्याचा उल्लेख आहे. याशिवाय उद्योगपती अनिल अंबानी, भाजप नेते मंत्री हरदीपसिंग पुरी आणि भारतीय वंशाचे लेखक दीपक चोप्रा यांची नावेही संदर्भ म्हणून आढळतात. मात्र, हे सर्व संदर्भ कथित भू-राजकीय किंवा सामाजिक संपर्कांपुरते मर्यादित आहेत. लैंगिक शोषण किंवा मानवी तस्करीच्या गुन्ह्यांशी त्यांचा थेट संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
एपस्टीन प्रकरणात (epstein files what will be revealed india impact explainer) यापूर्वी अमेरिकेतील अनेक राजकीय व आर्थिक उच्चभ्रू व्यक्तींची नावे चर्चेत आली असली, तरी भारताच्या संदर्भात सध्या केवळ ई-मेल संवाद आणि संपर्कांचे उल्लेख एवढीच माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी कागदपत्रांमुळे भारतात चर्चा आणि तर्क-वितर्क वाढू शकतात, पण मोदी सरकार किंवा भारतीय राज्यव्यवस्थेला राजकीय धक्का बसेल, अशी शक्यता तज्ज्ञ फेटाळून लावत आहेत.19 डिसेंबरपर्यंत किंवा त्यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या कागदपत्रांमध्ये ग्रँड ज्यूरीचे अहवाल, तपास यंत्रणांचे सारांश आणि आर्थिक व्यवहारांची माहिती असण्याची शक्यता आहे. मात्र पीडितांची गोपनीयता आणि सुरू असलेल्या तपासांच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणावर माहिती गुप्त ठेवली जाणार आहे. त्यामुळे भारताशी संबंधित कोणतीही नवी माहिती आली, तरी ती सनसनाटीपेक्षा अधिक संदर्भात्मक आणि मर्यादित स्वरूपाची असण्याचीच शक्यता अधिक आहे.
लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
एपस्टीनवर अनेक वर्षे अल्पवयीन मुलींना फूस लावून, पैसे देऊन लैंगिक शोषण केल्याचे आरोप होते. त्याची सहकारी घिस्लेन मॅक्सवेल ही मुली शोधून आणण्याचे काम करत असल्याचा तपासात निष्कर्ष निघाला. 2008 साली फ्लोरिडामध्ये त्याने चलाखीने शिक्षा टाळली. फक्त 18 महिन्यांची शिक्षा झाली, ती सुद्धा बहुतांश काळ बाहेर काम करण्याची परवानगी घेऊन शिक्षा झाली.
फ्लोरिडा तपासात काय घडलं?
2005 मध्ये एका 14 वर्षांच्या मुलीच्या तक्रारीनंतर पोलीस तपास सुरू झाला. पोलिसांनी सुमारे 40 पीडितांची माहिती गोळा केली होती. तरीही ग्रँड ज्यूरीने गंभीर गुन्हे न लावता केवळ किरकोळ आरोप ठेवले. तत्कालीन फेडरल सरकारी वकिल अॅलेक्स अकोस्टा यांनी केलेल्या करारामुळे एपस्टीनवर मोठे फेडरल गुन्हे दाखल झाले नाहीत. 2009 मध्ये तो अधिकृतपणे ‘सेक्स ऑफेंडर’ म्हणून नोंदणीकृत झाला.
2019 मध्ये एपस्टीनला पुन्हा अटक करण्यात आली
जुलै 2019 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एपस्टीनला पुन्हा अटक करण्यात आली. त्याच्यावर 2002 ते 2005 दरम्यान डझनभर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि तस्करी केल्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले. मात्र खटला सुरू होण्याआधीच त्याने आत्महत्या केली. 10 ऑगस्ट 2019 रोजी न्यूयॉर्कमधील तुरुंगात एपस्टीन मृतावस्थेत आढळला. अधिकृत अहवालानुसार त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, तुरुंगातील सुरक्षा कर्मचाऱ्यांची निष्काळजी, सीसीटीव्ही फुटेज गायब, शवविच्छेदन अहवालांतील मतभेद यामुळे आजही संशय बळावला आहे.
एपस्टीनचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंध कसा आला?
1980 ते 2000 या काळात एपस्टीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ओळख होती. दोघे एकाच सामाजिक वर्तुळात फिरत होते. ट्रम्पने एकदा एपस्टीनला तरुण मुली आवडणारा म्हटले होते. काही कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसले आणि एका विमानप्रवासाचाही उल्लेख आहे. मात्र 2004 मध्ये दोघांमध्ये एका आलिशान घरावरून वाद झाला. एपस्टीनवर एका अल्पवयीन मुलीबाबत गैरवर्तनाचा आरोप झाल्यानंतर ट्रम्प यांनी त्याला ‘मार-ए-लागो’ क्लबमधून हाकलल्याचे सांगितले जाते. यानंतर दोघांचे संबंध तुटले.
फोटो आणि ई-मेल्सने वाद वाढला
एपस्टीनच्या इस्टेटमधून 95 हजारांहून अधिक फोटो जप्त करण्यात आले. अलीकडे अमेरिकन संसदेने काही फोटो जाहीर केले आहेत, ज्यात ट्रम्प, बिल क्लिंटन यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती दिसतात. मात्र फक्त फोटोमध्ये दिसणे म्हणजे गुन्हा सिद्ध होतो, असे नाही, हेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच हजारो ई-मेल्समध्ये मोठ्या लोकांची नावे केवळ ओळख, संपर्क किंवा गप्पांसाठी आढळतात.
अमेरिकेत याचा काय परिणाम होऊ शकतो?
या सर्व प्रकरणामुळे अमेरिकेत मोठा राजकीय वाद सुरू आहे. डेमोक्रॅट पक्ष ट्रम्प प्रशासनावर दबाव टाकत आहे की सर्व कागदपत्रे जाहीर करावीत. 19 डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात फाईल्स उघड होण्याची शक्यता आहे. तरीही आजपर्यंत कोणतीही अधिकृत “क्लायंट लिस्ट” समोर आलेली नाही. एपस्टीनच्या मृत्यूनंतर त्याची सहकारी घिस्लेन मॅक्सवेल हिला अटक झाली. तिला अल्पवयीन मुलींच्या तस्करीस मदत केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले असून 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

