पुणे- महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. यावेळी भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी दिसून आली.पुणे महापालिका निवडणूक लवकरच होणार असून, विविध राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत प्रचाराची कामे सुरू केली आहेत. पुण्यात भाजपचे १०० नगरसेवक असल्याने, पक्षाकडून उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे. अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून २ हजार अर्जांची मागणी करण्यात आली, ज्यामुळे भाजपला मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याने भाजप नेत्यांची देखील उमेदवारी देताना सर्कस होणार आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी १० डिसेंबर पासून अर्ज स्वीकृती
दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आज कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुणे महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पक्षासोबत महायुतीतून लढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच पक्षाच्या उमेदवार निवडीसंदर्भात महत्वाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांच्या अर्जांचे वाटप आणि अर्ज स्वीकृती १० ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे. पक्षाच्या मुख्य कार्यालयात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत छापील अर्जफॉर्म उपलब्ध राहतील. इच्छुक उमेदवारांनी निर्धारित सर्व माहिती अचूकपणे भरून नियोजित वेळेत अर्ज जमा करण्याचे आवाहन पक्षतर्फे करण्यात आले आहे. बैठकीस शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, अशोक शिरोळे, मोहन जगताप, बाबूराव धाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, शहर महिला अध्यक्षा हिमाली कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

