पुणे- पुणे-सातारा रस्त्यावर पीएमपी बसच्या धडकेत एका अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. श्री शंकरमहाराज मठासमोर ही घटना घडली. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पळून गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावरील श्री शंकरमहाराज मठासमोरील बीआरटी मार्गातून जात असलेल्या एका पादचाऱ्याला भरधाव वेगात आलेल्या पीएमपी बसने धडक दिली. पादचारी गंभीर जखमी झाला होता.
जखमी पादचाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अद्याप मृताची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी पोलीस शिपाई अकिल तडवी यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीएमपी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एन. काळे पुढील तपास करत आहेत.

