सिनेमा एआय हॅकेथॉन 2025 ने जागतिक प्रतिभांना आकर्षित केले; या 48 तासांच्या स्पर्धेसाठी 14 संघांत होती चुरस
#IFFIWood,SHARAD LONKAR 25 नोव्हेंबर 2025
वेव्हज चित्रपट बाजाराच्या अंतर्गत आयोजित सिनेमा एआय हॅकेथॉन 2025 या स्पर्धेने चित्रपटनिर्मितीमधील कला, तंत्रज्ञान आणि मूल्ये यांच्या अनोख्या छेदनबिंदूचा उत्सव साजरा केला. या मंचाने जगभरातील निर्मात्यांना सर्जक परिणामांमध्ये जबाबदारी, पारदर्शकता आणि अस्सलपणा जपून ठेवून पटकथा लेखन, व्हिडीओ निर्मिती, संकलन आणि उत्पादन यांसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे संचालित साधनांचा वापर करून कथाकथनाच्या सीमा ओलांडण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
महत्त्वाच्या सर्जनशील आणि तांत्रिक आयामांमध्ये उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी देण्यात येणाऱ्या पाच पारितोषिकांचे विजेते खालीलप्रमाणे आहेत:
- आयुष राज यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘माय रेड क्रेयॉन’ या हिंदी भाषेतील चित्रपटासाठी कल्पंक या पथकाला सर्वोत्कृष्ट एआय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.
- केयूर काजवदर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रिमॉरी’ या इंग्रजी भाषेतील चित्रपट निर्मितीसाठी अटोमिस्ट गटाला एआयचा सर्वात नाविन्यपूर्ण उपयोग करण्यासाठीचे पारितोषिक देण्यात आले.
- ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या समरेश श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंदी चित्रपटासाठी समरेश श्रीवास्तव आणि यज्ञ प्रिया गौतम यांना सर्वोत्कृष्ट कथाकथनाचे पारितोषिक देण्यात आले.
- इंडीवुड संघ आणि वाँडरवॉल मिडिया नेटवर्क्स च्या ‘बीइंग’ या सुमेश लाल यांनी दिग्दर्शित केलेल्या इंग्रजी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दृश्य परिणामांसाठी पारितोषिक देण्यात आले.
- राजेश भोसले यांच्या ‘मॉन्सून एको’ या इंग्रजी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ध्वनी/संगीत रचनेचा पुरस्कार देण्यात आला.
या हॅकेथॉन साठी दोन टप्प्यांतील ऑनलाईन पद्धत स्वीकारण्यात आली. पहिल्या टप्प्यात व्यक्ती अथवा गटाला (अधिकाधिक पाच सदस्यांच्या) त्यांनी आधी तयार केलेला एआय-आधारित चित्रपट (2 ते 10 मिनिटे कालावधीच्या) सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.
यासाठीची अर्जप्रक्रिया 1 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत खुली होती आणि यासाठी उदंड प्रतिसाद मिळाला कारण यात 180 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले होते. निवड समित्यांकडून त्यांचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर, 14 संघांना 48 तासांच्या अंतिम स्पर्धेसाठी निवडण्यात आले.
स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात, भाग घेतलेल्या स्पर्धकांना संकल्पना देण्यात आली होती: पुनर्परिकल्पित आठवणी. स्पर्धकांना भावनिकदृष्ट्या भावणारी कथा निर्माण करण्यासाठी वास्तववाद आणि कल्पनाशक्ती यांचा मिलाफ साधत, एखाद्या गहन वैयक्तिक आठवणीचा नव्याने अर्थ लावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेली 60 ते 120 सेकंदांची चित्रपटीय कथा निर्माण करायची होती.
हे 48 तासांचे आव्हान भारतीय वेळेनुसार 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.00 वाजता सुरु झाले आणि ते 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता संपले.
परीक्षक पथक – सिनेमा एआय हॅकेथॉन 2025
या स्पर्धेच्या परीक्षक पथकात पुढील मान्यवरांचा समावेश होता:निर्माते, दिग्दर्शक आणि इफ्फीचे उत्सव संचालक शेखर कपूर; निर्माते, दिग्दर्शक रामदास नायडू; दिग्दर्शक, अॅनिमेटर अश्विन कुमार; भारतीय चित्रपट वारसा संस्थेतील चित्रपट इतिहासकार आशा बात्रा; एलटीआयमाइंडट्री चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि परस्पर संवादी सेवा विभागाचे जागतिक प्रमुख डॉ.सुजय सेन; डिझाईन नीती आणि क्राफ्टस्टुडीओ, एलटीआयमाइंडट्रीच्या परस्पर संवादी सेवा विभागाच्या जेष्ठ दिग्दर्शक नयना राऊत; एलटीआयमाइंडट्रीचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि संवाद, माध्यम आणि मनोरंजन विभागाचे मुख्य व्यवसाय अधिकारी दिव्येंदू हलधर आणि एलटीआयमाइंडट्री च्या मुख्य विपणन अधिकारी नेहा कथुरिया
स्पर्धकांनी दाखवलेली अस्सलता, तांत्रिक कौशल्ये आणि भावनिक खोली अधोरेखित करत परीक्षकांनी इतक्या कमी वेळात निर्माण केलेल्या चित्रपटांची अद्वितीय गुणवत्ता आणि सर्जनशीलता याबद्दल प्रचंड प्रशंसा केली.
चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाची परिवर्तनकारी क्षमता दाखवत आणि चित्रपट निर्मात्यांच्या आगामी पिढीसाठी नवी क्षितिजे खुली करत सिनेमा एआय हॅकेथॉन 2025 ही स्पर्धा म्हणजे एक महत्वाचा उपक्रम ठरली.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.

