मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. ते तिथे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी राज्यातील राजकीय घटनाक्रमावर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. सत्ताधारी शिवसेनेने मंगळवारी भाजपवर आपले पदाधिकारी फोडण्याचा आरोप केला होता. तद्नंतर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कारही टाकला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेलेत हे विशेष.
राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी साप्ताहिक बैठक झाली. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी भाजपवर फोडाफोडीचे आरोप करत या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे हजर होते. पण फडणवीसांनी शिंदेंपुढेच त्यांच्या मंत्र्यांची खरडपट्टी काढली. या घटनेनंतर शिंदेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका व्यासपीठावर एकत्र येणे टाळले. यामुळे एकनाथ शिंदे भाजपवर नाराज झाल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे आज दिल्लीला रवाना झालेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आज तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेलेत. ते तिथे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय घटनाक्रमावर चर्चा करतील. विशेषतः ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही भेट घेऊन त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर तेथूनच ते नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहण्यासाठी बिहारची राजधानी पाटण्याला जातील.
उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यातील सत्ताधारी महायुतीत काही वाद झाला तर एकनाथ शिंदे नेहमीच दिल्लीत जाऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्याचे नेहमीच वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जातात. गत ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच त्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपण दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदींची भेट घेतल्याचे सांगितले होते. पण प्रत्यक्षात त्यांच्या या दौऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जागावाटप आणि पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या वादाची किनार होती.
तत्पूर्वी, ऑगस्ट महिन्यात एकनाथ शिंदे दोनवेळा दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांचे वाढलेले दिल्ली दौरे हे महायुतीत सर्वकाही ठिकठाक नसल्याचे द्योतक असल्याचे मानले जात आहे.
शिंदेंची शिवसेना भाजपवर नाराज का?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते व पदाधिकारी सातत्याने फोडले जात आहेत. शिवसेनेला अडचणीचे ठरतील असे अनेक पक्षप्रवेश भाजपकडून राज्यात होत आहेत. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे व त्यांच्या पत्नी अश्विनी म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.
हा घटनाक्रम एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आज भाजपमध्ये प्रवेश करणारे पदाधिकारी श्रीकांत शिंदे यांच्या खास मर्जीतील होते. त्यामुळे भाजपनेच त्यांनाच गळाला लावल्यामुळे शिंदे गट भाजपवर प्रचंड नाराज झाला आहे. त्यांची नाराजी कालच्या कॅबिनेट बैठकीतही दिसून आले. शिवसेनेच्या एकाही मंत्र्याने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली नाही. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन भाजपकडून फोडण्यात येणाऱ्या मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुद्यावर जाब विचारला. आता हे प्रकरण पुढील काही दिवस असेच तापण्याची शक्यता आहे.

