प्रभाग रचनेतील हरकतींना केराची टोपली, राष्ट्रवादी आक्रमक
पुणे- प्रभाग रचनेतील हरकतींना केराची टोपली दाखवून प्रभाग रचनेत रडीचा डाव केला तऱी जनता निवडणुकीत न्याय करेल असे आज येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे
पुणे महापालिकेच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. त्यावर तातडीने जगताप यांनी प्रतिक्रिया देत संतापही व्यक्त केला आहे. ते म्हणाले,’महाराष्ट्राचे नगररचना खाते नावापुरते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असले, तरी या खात्याची सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच हलवले जातात. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील इतर घटकपक्षांना विश्वासात न घेता देवेंद्र फडणवीस यांनी रडीचा डाव खेळत भाजपने प्रभाग रचना केली. या प्रभाग रचनेवर हजारो पुणेकरांनी आक्षेप नोंदवला होता, मात्र प्रत्यक्षात प्रभाग रचनेत काहीही बदल न करता केवळ प्रभागांच्या नावांमध्ये बदल करून भाजपने पुणेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या बळावर हा रडीचा डाव खेळला. पुणेकरांना ही सत्तेची मस्ती आजिबात आवडलेली नाही. वाहतूक कोंडीच्या बाबतीत जगात पाचवा नंबर, गुन्हेगारीच्या बाबतीत भारतात पहिला नंबर, भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारतात पहिला नंबर मिळवून सत्ताधाऱ्यांनी पुणेकरांच्या लौकिकाला गालबोट लावला आहे. याचे उत्तर पुणेकर नागरिक आपल्या मतदानातून नक्कीच व्यक्त करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जनतेच्या पसंतीचे दमदार उमेदवार घेऊन मैदानात उतरणार आहे. महानगरपालिका निवडणुकीत जनतेचा पाठिंबा नक्कीच महाविकास आघाडीला मिळेल.

