नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे आणि सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन मार्फत गांधी जयंती साजरी
पुणे, 2 ऑक्टोबर 2025
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (एनआयएन), पुणे तसेच सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन (सीबीसी) यांच्या वतीने आज भारत सरकारच्या माननीय आयुष मंत्री श्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत गांधी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला एनआयएनच्या संचालक डॉ. के. सत्यलक्ष्मी; एनआयएनचे गव्हर्निंग बॉडी सदस्य अनंत बिरादार आणि सीबीसी व्यवस्थापक डॉ. जितेंद्र पानपाटील हेसुद्धा उपस्थित होते.
पुण्यातील मातोश्री रमाबाई आंबेडकर रोडवरील एनआयएन कॅम्पसमध्ये गांधी जयंतीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून, श्री प्रतापराव जाधव यांनी संस्थेच्या आवारात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात केली. यानंतर त्यांनी एनआयएन येथे स्थापन झालेल्या गांधी संग्रहालयाला भेट दिली, जिथे त्यांनी गांधीजींनी वापरलेल्या विविध वैयक्तिक वस्तू आणि त्यांनी लिहिलेली पत्रे पाहिली. या कार्यक्रमात सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनने सादर केलेल्या गांधी भजनांचे भावपूर्ण सादरीकरण देखील करण्यात आले.
डॉ. के. सत्यलक्ष्मी यांनी मान्यवरांचे आणि प्रेक्षकांचे स्वागत केले आणि संस्थेच्या आरोग्य सेवा, चालू संशोधन उपक्रम आणि सामुदायिक पोहोच कार्यक्रमांचा तपशीलवार आढावा सादर केला.
श्री. जाधव यावेळी म्हणाले, महात्मा गांधी हे निसर्गोपचाराचे आजीवन पुरस्कर्ते होते यावर भर दिला आणि नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात या औषध पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्यांनी सर्वांना गांधीजींचे सत्य आणि अहिंसेचे कालातीत आदर्श आत्मसात करण्याचे आवाहन केले आणि पुढे म्हटले की निसर्गोपचार आणि योगाचा सराव करणे हीच राष्ट्रपित्याला खरी आदरांजली आहे.

समारंभाचा एक भाग म्हणून, मंत्री महोदयांनी महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित एका पुस्तकाचे प्रकाशन देखील केले. नंतर, त्यांनी एनआयएनच्या येवलेवाडी कॅम्पसमध्ये आयोजित वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदवला.

