पुणे : मुळशी तालुक्यात अंबडबेट येथील एका रासायनिक कंपनीत रविवारी (ता. 28) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. दुपारी साधारण 12.15 च्या सुमारास लागलेल्या आगीसोबत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
https://www.facebook.com/share/v/1LXLxpExE5/
या कंपनीत सोडियम क्लोराइडचे पॅकेजिंग केले जात असल्याचे समजते.आगीची माहिती मिळताच मारुंजी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच पौड पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिसर सील करून बचावकार्याला सुरुवात केली. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट परिसरात पसरले होते. स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून, स्फोटामुळे कंपनीच्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेत दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असलेल्या तिघा कामगारांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींमध्ये संदीप लक्ष्मण शेंडकर (49, जळीत सुमारे 60 टक्के), मोहित राज सुखन चौधरी (49, जळीत सुमारे 60 टक्के) आणि महिला रेणुका धनराज गायकवाड (40, जळीत अंदाजे 10 टक्के) यांचा समावेश आहे. तिघांनाही तातडीने घोटावडे फाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.
घटनेचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. रासायनिक स्फोटामुळे आग लागली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून अधिक तपास पौड पोलिस करीत आहेत. यासंदर्भात कंपनीतील इतर कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींचेही जबाब घेतले जात आहेत.

