शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी प्रार्थना व महिलांच्या सक्षमीकरणावर भर
कोल्हापूर, दि. २५ सप्टेंबर २०२५ :
विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी प्रार्थना केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीमुळे त्यांना यातून सावरण्याचे बळ मिळो अशी मनोकामना त्यांनी देवीसमोर व्यक्त केली. यावेळी त्यांनी देवीला महावस्त्र व पुरणपोळ्यांचा नैवेद्य अर्पण केला.

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणे केवळ आर्थिक मदतीपुरतेच मर्यादित नसून त्यांच्या जीवनमानाशी निगडित विषय मार्गी लावणे त्यांच्या भावी पिढ्यांच्या सुरक्षितते सोबतच शाश्वत शेतीसाठी गरजेचे असल्याचे आणि यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.“शेती हा महाराष्ट्राचा कणा आहे. शेतकऱ्यांचे संकट कमी करणे म्हणजे समाजाच्या प्रगतीला गती देणे होय.” महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार मदतीसाठी संवेदनशील भूमिका घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दर्शनानंतर डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधावा, सामाजिक प्रश्नांवर तत्परतेने उभे राहावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. महिलांना मिळालेल्या ५० टक्के राजकीय आरक्षणाचा लाभ घेऊन नेतृत्वाच्या आघाडीवर यावे, असे आवाहन करताना त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक बळकटीवर भर दिला.
बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी पदाधिकाऱ्यांचे काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष वेधले. लोकांच्या दैनंदिन समस्या सोडविणे, शेतकरी व कष्टकरी वर्गाला मदतीच्या योजनांची माहिती पोहोचविणे, तरुणांना रोजगार व कौशल्यविकासाशी जोडणे, पर्यावरण संवर्धन व पूर-आपत्ती व्यवस्थापनावर कार्य करणे तसेच सामाजिक सलोखा जपणे या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला.
या बैठकीस कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते. त्यांच्यासह शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, सातारा-कोल्हापूर संपर्कप्रमुख शारदा जाधव, सांगली संपर्कप्रमुख सुनिता मोरे, कोल्हापूर जिल्हाप्रमुख शुभांगी पवार, इचलकरंजी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे, शहरप्रमुख अमरजा पाटील, उत्तर कोल्हापूर शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, युवती शहरप्रमुख नम्रता भोसले, जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण व विजय बलगुडे उपस्थित होते.

