सुनील देशमुख लिखित ‘विदेशमुखी’ यशोगाथेच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन
पुणे, ता. २४: “भारतात ज्ञानाची मोठी शक्ती आहे. अनेक परदेशी लोक इथे येऊन ज्ञान ग्रहण करतात व जगाला सेवा पुरवतात. भारतीयांनी आपल्या ज्ञानाची शक्ती ओळखून घेत प्रगतीचा मार्ग शोधला पाहिजे. जगाकडून शिकण्यासह जगाला शिकवण्याची जिद्द आपल्याकडे हवी. भारतीय ग्राहकांचे समाधान करणारे उत्पादन जगात यशस्वी ठरते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी केले. पुणे सर्वार्थाने समृद्ध असून, पुण्याला जागतिक केंद्र बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले.
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्सच्या (आयएमए) संचालक मंडळाचे ग्लोबल चेअर सीएमए सुनील देशमुख लिखित ‘विदेशमुखी’ पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांच्या हस्ते झाले. सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या नवलमल फिरोदिया सभागृहात झालेल्या सोहळ्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, आयटी तज्ज्ञ व लेखक डॉ. दीपक शिकारपूर, प्रकाशक अमलताश बुक्सचे सुश्रुत कुलकर्णी, देशमुख यांच्या पत्नी माधुरी देशमुख आदी उपस्थित होते.
अरुण फिरोदिया म्हणाले, “लोकांकडून, ग्राहकांकडून शिकत गेल्याने माझ्या मनात अनेक नवनव्या कल्पना विकसित होत गेल्या. आपण जे काही करू त्यात यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास आपल्याकडे हवा. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी बाहेर पडा व शिकत राहा. विविध ठिकाणचे लोक, बाजारपेठ समजून घ्या. त्यासाठी देशाटन करत राहा. भारतात शिकून जगभरासाठी काम करा. जिद्द आणि उमेदीने संघर्षाशी दोन हात करून सुनील देशमुख यांनी आयुष्याला प्रेरणादायी यशोगाथा बनवली आहे. त्यांचा हा यशस्वी जीवनप्रवास तरुण पिढीसाठी आदर्शवत आहे. त्यामुळे अशा यशोगाथा व्यवस्थापनासह इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला हव्यात. बिकट वाटेला न घाबरता धैर्याने यशशिखरे संपादन करत राहावीत.”
डॉ. पराग काळकर म्हणाले, “यशस्वी माणसेच इतरांना प्रेरणा मार्ग दाखवतात. नांदेडच्या छोट्याशा गावातून सुरु झालेला सुनील देशमुख यांचा प्रवास जागतिक स्तरावर गेला. त्यांच्या या सातत्यपूर्ण यशामागे आपले परिश्रम, जिद्द असते. त्यांची ही यशोगाथा तरुणांसाठी ऊर्जादायी आहे. यशाच्या शिखरावर पोहचूनही आपल्या मातीशी, गावाशी आणि माणसांशी नाळ जोडून ठेवणारा हा माणूस आहे. तरुणांनी देशमुखांचा हा आदर्श घेऊन जीवनात यशाकडे वाटचाल करावी. छोट्या अपयशाने खचून न जाता झालेल्या चुकांचे अवलोकन करून पुन्हा नव्या ऊर्जेने प्रयत्न करावेत.”
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “आयुष्य हे खूप सहज असते. आपण त्याला किचकट करतो. शिका, कमवा आणि परत करा या तीन मूल्यांवर आपले आयुष्य आधारलेले असते. दादा वासवानी यांनी दिलेल्या तत्वांवर वाटचाल केली, तर सदृढ समाजाची जडणघडण होईल. लेखनाला तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. सध्याचा काळ डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. युवा पिढी वाचण्यासाठी पुस्तकांबरोबर तंत्रज्ञानाचा उपयोग करते. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी पॉडकास्ट, ऑडिओ बुक अशा विविध माध्यमांचा उपयोग केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने विविध भाषांमध्ये हे पुस्तक जावे.”
सुनील देशमुख यांनी पुस्तकाचा प्रवास उलगडून सांगितला. जिद्दीने काम करत राहिलो. आयुष्यात अनेक संघर्षाचे क्षण आले, पण त्यात खचून न जाता धैर्याने उभा राहिलो. या प्रवासात अनेकांनी चांगली साथ दिली. त्यामुळे हा प्रवास अधिक सुखद होत गेला, असे देशमुख यांनी नमूद केले. प्रशांत शुक्ला, मानसी शहा यांनी सूत्रसंचालन केले. प्रचिती अंकाईकर यांनी आभार मानले.

