पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे स्व. दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने आज (दि. २७) गझलकारा गाथा जाधव-आयगोळे (कल्याण) यांचा गौरव करण्यात आला.
पत्रकार भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन मंचावर होते.
सातत्य आणि यश हातात घालून चालत असतात. त्यामुळे कार्यक्रमातील सातत्य आम्ही कायम ठेवत आलो आहोत. रंगत-संगत प्रतिष्ठानला ३३ वर्षे झाली. दीड हजाराच्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दीपक करंदीकर यांच्यासारखे गझलप्रेमी कायम स्मृतीत राहावेत यासाठी गझलकारास पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार युवा पिढीच्या साहित्यक्षेत्रातील कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ते करत असलेल्या कार्यासाठी कौतुकाची थाप म्हणून देण्यात येतो, असे प्रमोद आडकर यांनी या प्रसंगी सांगीतले.
सत्काराला उत्तर देताना गाथा जाधव-आयगोळे म्हणाल्या, लिहिण्याचा वारसा वडिलांकडून मिळाला. शाळेत असताना पहिल्यांदा लिहायला घेतले. जेव्हा जसे सुचले तसे लिहित गेले आणि लिहीत राहिले. लग्नाआधी वडिलांनी आणि नंतर पतीने माझ्यासोबत माझ्या लिखाणालाही पाठिंबा दिला. घरातूनच आधार मिळाला की स्त्री काहीही करू शकते. त्यामुळे अशी साथ प्रत्येक स्त्रीला मिळायला हवी. गझल लिखाणासोबतच सध्या गझलांवर सुरू असलेल्या संशोधनाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करत आहे. प्रज्ञा महाजन यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि स्वरचित गझल सादर केली.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त निमंत्रितांचे गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात प्राजक्ता पटवर्धन, प्रभा सोनवणे, अजय जोशी, स्वाती यादव, चैतन्य कुलकर्णी शउर, रेखा कुलकर्णी, शीला टाकळकर, कविता क्षीरसागर, चंचल काळे, अमिता पैठणकर, डॉ. मृदुला कुलकर्णी खैरनार या निमंत्रितांनी गझल सादर केली.
वासंती वैद्य, ऋचा कर्वे, प्राजक्ता वेदपाठक उपस्थित होते. शिल्पा देशपांडे आणि वैजयंती आपटे यांनी सूत्रसंचालन केले.
दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने गाथा जाधव-आयगोळे यांचा गौरव
Date:

