पुणे-‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या फर्ग्युसन महाविद्यालयात एक हजार देशी वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा शुभारंभ फुलगाव येथील श्री श्रुतीसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते आज करण्यात आला.
रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटीकर, पर्यावरण समितीचे अध्यक्ष विवेक मठकरी, प्राचार्य डॉ. श्याम मुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व विश्वस्त, संचालक,प्राचार्य, बँकांचे अधिकारी अधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
नानासाहेब जाधव म्हणाले, “पर्यावरणाचे असंतुलन व्हायला आपण सर्वजण जबाबदार आहोत. आपण ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. विकासाच्या चुकीच्या धारणा आणि आपली दोषयुक्त जीवनशैली पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला कारणीभूत आहेत. भारतीय तत्त्वज्ञानात सांगितल्याप्रमाणे निसर्गाचा एकात्मिक विचार करणे आवश्यक आहे. जैविक परिवार संकल्पना प्रत्यक्षात आणली पाहिजे. तसेच निसर्गाकडे सहअस्तित्व, सामंजस्य आणि सौहार्दपूर्ण दृष्टीने पाहण्याची गरज आहे. “
.
स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले, ” विकासाच्या नावावर आपण अहोरात्र काम करत आहोत. परंतु काय विकास झाला आणि किती विकास झाला हा प्रश्न आहे. सर्व जण विकासाची भाषा बाह्य अंगानेच वापरतात. जास्तीत जास्त संसाधनांचा वापर म्हणजे विकास असे म्हटले जाते. परंतु विकास करताना माणूस कुठल्या स्तराला जाऊन पोचला आहे. खरोखर विकास झालाय की जीवनाच्या नीतीमूल्यांचे, विचारांचे अवमूल्यन झाले आहे हा प्रश्न आहे.”
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शंभर एकर परिसरात जैवविविध्यता आहे. या ठिकाणी दोनशेहून अधिक प्रजातींचे दहा हजारहून अधिक वृक्ष आहेत. त्यामुळे या परिसरात परदेशी स्थलांतरित पक्षीही वास्तव्यासाठी दरवर्षी येतात. हा परिसर अधिक जैववैविध्य संपन्न करण्याच्या उद्देशाने आज शंभर प्रजातींचे एक हजार वृक्षांच्या लागवडीचा शुभारंभ केल्याची माहिती पर्यावरण समितीचे अध्यक्ष विवेक मठकरी यांनी प्रास्ताविक भाषणात दिली.

