पुणे: सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व फोर्ट फिट मुव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोहीम रायरेश्वराची’ हा ऐतिहासिक उपक्रम रविवारी (ता. १३ जुलै) यशस्वीरित्या पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेल्या रायरेश्वर गडाच्या पावन भूमीत ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. मोहिमेला लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत ६३५ जणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.
यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ या घोषणांनी प्रत्येकाच्या मनात शिवप्रेम जागवले. रायरेश्वरावरील ऐतिहासिक वास्तू, निसर्गसौंदर्य व शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास यामुळे सहभागींचे मन भारावून गेले. यावेळी स्वच्छता मोहीमदेखील राबवण्यात आली.
सदर मोहिमेमागील प्रमुख हेतू ट्रेकिंगच्याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहास जाणून घेत पुढच्या पिढ्यांपर्यंत तो नेणे हा होता. “इतिहास फक्त पुस्तकांमध्ये वाचायचा नसतो, तो असा अनुभवायचाही असतो,” असे आयोजकांनी यावेळी सांगितले.
सदर उपक्रम सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व फोर्ट फिट मुव्हमेंट यांच्या गडकिल्ले मोहिमांच्या मालिकेतील हे पहिले पुष्प होते. येणाऱ्या काळातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांवर अशा मोहिमा राबवण्याचे नियोजन आहे.
सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे म्हणाले, “गडकिल्ले आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहेत आणि हे वैभव जपणे आपले कर्तव्य आहे. या उपक्रमातून हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला समृद्ध वारसा पुढे नेण्याचे काम करायचे आहे.”
“छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या भूमीत येऊन एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. आपला इतिहास हा आपला अभिमान आहे आणि तो अभिमान आपण कायम बाळगला पाहिजे, ही जाणीव अजून घट्ट झाली. सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व फोर्ट फिट मुव्हमेंटने सुरू केलेला हा उपक्रम खूप स्तुत्य आहे. आपल्या इतिहासाशी पुन्हा एकदा नव्याने जोडले जात आहोत”, अशा उत्स्फूर्त भावना मोहिमेतील सहभागार्थींनी व्यक्त केल्या.

