पुणे, दि. 4: महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, इंदापूर येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता इ. 8 वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ व शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामुल्य भोजन, निवासाची व्यवस्था असून क्रमिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश, शैक्षणिक सहल रक्कम इत्यादी करिता शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेपर्यंतची रक्कम व दरमहा रु. 500/- निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो.
वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्याची मागील वर्षाची गुणपत्रिका, जातीचा दाखला, पालकांचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाविद्यालयात शिकत असलेला बोनाफाईड दाखल, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र आदी कागदपत्रासह ऑनलाइन अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर करणे आवयक आहे. अधिक माहितीसाठी गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, दूधगंगा दुधडेअरी समोर, जुना अकलूज-पुणे बायपास, इंदापूर, जि. पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.

