पुणे : माझ्यातील खिलाडू वृत्तीला मुंबईतील गणेश मंडळात चालना मिळाल्याने खेळाडू म्हणून जडण-घडण झाली. पदकमंचापर्यंत पोहोचणारा एकच खेळाडू असतो. त्याच्या यशप्राप्तीसाठी मेहनत, जिद्द या बरोबरीनेच सुहृदांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद महत्त्वाचे असतात, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीच्या नेमबाज अंजली भागवत यांनी केले. आजच्या काळात समाज एकत्र राहण्यासाठी हिंदुत्व टिकविण्याची गरज आहे. ते कार्य गणेश मंडळांमार्फत घडावे. कारण गणेश मंडळे फक्त सामाजिक कामच नाही तर वैचारिक देवाणघेवाणीचे कार्यही मोठ्या प्रमाणात करतात, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
जागतिक कीर्तीच्या नेमबाज अंजली भागवत यांचा साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे साई पुरस्काराने आज (दि. 6) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण आमदार हेमंत रासने, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार, अर्जुन आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त रेखा भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने मंचावर होते. बुधवार पेठेतील श्री साईबाबा मंदिरच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिरंगी पुणेरी पगडी, शाल, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदाचे 18वे वर्ष आहे. सुरुवातीस सुवासिनींनी मान्यवरांचे औक्षण केले.
साईंच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझा भाग्ययोग आहे, असे सांगून अंजली भागवत म्हणाल्या, पुरस्कार कुठले आणि कुठे मिळतात याचे महत्त्व आहे. श्री साई पुरस्कार हा माझ्यासाठी बहुमूल्य आहे. सिडनी ऑलिंपिकमध्ये माझी निवड होण्याकरीता बरीच वाट बघावी लागली. त्यावेळी माझ्या वडिलांना शिर्डीला जाऊन साईंकडे प्रार्थना केली आणि दुसऱ्याच दिवशी निवड झाल्याचे समजले, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, पुण्यातील गणेश मंडळांना खूप मोठी परंपरा आहे. गणेश उत्सवातच नव्हे तर वर्षभर गणेश मंडळे आदर्शवत काम करीत असतात. अंजली भागवत यांना रेखा भिडे यांच्या हस्ते साई पुरस्काराचे वितरण होत आहे हा मणिकांचन योग आहे, असे सांगून डॉ. मोरे पुढे म्हणाले, साई म्हणजे सावली किंवा छाया. या पुरस्काराच्या माध्यमातून साईंच्या कृपेची सावली लाभली आहे.
रेखा भिडे म्हणाल्या, मी साईभक्त असून लहानपणापासून अनेकदा शिर्डीला गेले आहे. साईनाथ मंडळाचे कार्यकर्ते अत्यंत उत्स्फूर्ततेने सामाजिक कार्य करत आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी श्रद्धा आणि सबुरी असणे अत्यंत आवश्यक आहे. अंजली भागवत या अतिशय निष्ठावान खेळाडू असून युवा पिढीला मार्गदर्शन करीत आहेत, याचे कौतुक आहे.
आमदार हेमंत रासने म्हणाले, नेमबाजीत उच्च यश प्राप्त केलेल्या अंजली भागवत यांना हॉकी या क्रीडा प्रकारातील महनीय खेळाडू रेखा भिडे यांच्या हस्ते साई पुरस्काराने सन्मानित केले ही गौरवास्पद बाब आहे. या निमित्ताने व्यासपीठावर क्रीडा क्षेत्रातील रणरागिणी उपस्थित आहेत.
साईनाथ मंडळ ट्रस्टच्या कार्याची माहिती देताना प्रास्ताविकात पियूष शहा म्हणाले, पुण्यात सामाजिक क्षेत्रात गणपती मंडळांचे काम मोठे असून ही मंडळे म्हणजे पुण्याच्या रक्तवाहिन्याच आहेत. या पुरस्काराच्या माध्यमातून एका हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत जाण्यासाठी गौरव सोहळा आयोजित केला जातो.
मान्यवरांचे स्वागत पियूष शहा, प्रविण गोळवडेकर, प्रशांत पंडित, प्रसाद भोयरेकर यांनी केले. सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन जतीन पांडे यांनी केले. अमर राव, नरेंद्र व्यास, प्रवीण वळवडेकर, शंकर निंबाळकर, प्रसाद भोयरेकर, अमित दासानी, संकेत निंबाळकर, प्रशांत पंडित यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. आभार पियूष शहा यांनी मानले.