पुणे : समाजकार्यात महिला शक्ती किती सक्षम असू शकते हे ‘स्नेहाधार गौरव पुरस्कारा’तून समाजापुढे येत आहे. सामाजिक कार्यातून समाजाला दिशा व प्रेरणा मिळते. सामाजिक क्षेत्रात समाजकंटक मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरतात. परंतु विरोधाला न डगमगता, दृढ निश्चयाने कार्यरत असणाऱ्या वासंती देव आणि मनिषा पवार यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन निष्णात गिर्यारोहक, गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक उमेश झिरपे यांनी केले.
स्नेहालय, अहिल्यानगर संचलित स्नेहाधार पुणे परिवारातर्फे ‘स्नेहाधार गौरव पुरस्कारां’चे वितरण झिरपे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. निवारा सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात पेण येथील ‘अहिल्या महिला मंडळ’च्या संस्थापिका वासंती श्रीकांत देव आणि कळसंबर (ता. बीड) येथे ‘आपला परिवार’ वृद्धाश्रमाची स्थापना करणाऱ्या मनीषा भाऊराव पवार यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी होते. प्रसिद्ध व्यावसायिक कृष्णा राजाराम अष्टेकर यांची विशेष उपस्थिती होती. स्नेहाधार परिवार, पुणेच्या सहसंचालिका गौरी पाळंदे मंचावर होत्या. शाल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
उमेश झिरपे पुढे म्हणाले, संस्थात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात समाजकार्य करणे वाटते तितके सोपे नाही, या करिता पुरस्कारप्राप्त महिलांनी त्याग आणि धाडस केलेले आहे. समाजाने त्यांच्या कार्याला भरभरून मदत करावी आणि सशक्त पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
अध्यक्षपदावरून बोलताना सुहास मापारी म्हणाले, स्नेहालय ही फक्त संस्था नसून हे चालते, बोलते, फिरते विद्यापीठच आहे. दु:खी, पिडित, वंचित घटकांसाठी असलेल्या योजना माहिती अभावी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. अशा वेळी समाजकार्य करणाऱ्या संस्था लाभार्थी आणि शासनामधील दुवा ठराव्यात. विपरित परिस्थितीत जिद्दीने सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था खऱ्या अर्थाने समाजाच्या नायक आहेत.
गो-सेवेच्या क्षेत्रात कार्यरत असताना स्नेहालय या संस्थेशी संपर्क आला, असे सांगून कृष्णा अष्टेकर म्हणाले, या संस्थेचे कार्यकर्ते जीवाला जीव देऊन अखंडितपणे कार्यरत आहेत. या पुरस्काराच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या इतर संस्थांनाही नेटाने काम करण्याची स्फूर्ती-जिद्द देत आहेत. हे कार्य म्हणजे परमेश्वराची खरी पूजा आहे.
वासंती देव यांच्यावतीने मनोगत व्यक्त करताना अश्विनी गाडगीळ म्हणाल्या, सामाजिक दायित्व ओळखून अहिल्या महिला मंडळाच्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील स्त्रियांसाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करण्यात येत आहे. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी कार्यकर्ते अविरतपणे प्रयत्नशील आहेत. प्रामाणिकपणे काम केल्यास समाज कायम पाठीशी उभा राहतो, असा अनुभव आहे.
पुरस्काराने फक्त आत्मविश्वासच वाढला नाही तर पुढील कार्य करण्यास प्रेरणा मिळाली असल्याचे सांगून मनिषा पवार म्हणाल्या, समाजातील दु:ख पाहून ज्येष्ठांसाठी कार्य करावे, या संकल्पनेतून वृद्धाश्रमाची स्थापना केली. आमच्या संस्थेचे कार्य पाहून पुण्यातील अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींनी आमच्या कार्याला मदत केली आहे.
प्रास्ताविकात शुभांगी कोपरकर यांनी संस्थांच्या उपक्रमांची माहिती सांगितली. मान्यवरांचे स्वागत गौरी पाळंदे, सुहास मापारी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख विवेक नारळकर यांनी करून दिली. मानसी चंदगडकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.