श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट पालखी पादुका दर्शन सोहळा : वीरेंद्र किराड यांना यंदाचा श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार
पालखी सोहळ्याचे यंदा २८ वे वर्ष
पुणे : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ पालखीचे पुण्यात आगमन होत असून बुधवार दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मंडईमधील श्री शारदा गजानन मंदिरापासून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त १६ मार्च पर्यंत महानगरपालिकेजवळील कॉंग्रेस भवन येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आणि श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे यांच्या हस्ते पालखी पादुका पूजन आणि आरती होऊन मिरवणूकीस प्रारंभ होईल. पालखी सोहळ्याचे यंदा २८ वे वर्ष आहे.
यंदाचा श्री स्वामी समर्थ पुरस्कार श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट पुणे चे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र किराड यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार दि. १६ मार्च रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे उपस्थित राहणार आहेत.
पालखी सोहळ्यात गुरुवार, दिनांक १३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता तुकाराम दैठणकर आणि हर्षद कुलकर्णी हे ‘स्वामी भक्ती गीते’ सादर करणार आहेत. तसेच शुक्रवार, दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता लुई ब्रेड अंध अपंग कल्याण संस्था ऑर्केस्ट्रा साई सातसूर परिवार सांस्कृतिक मंच यांचा ‘साई सातसुर’ हा कार्यक्रम होणार आहे. तर १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मुकुंद बादरायणी हे ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. रविवार दिनांक १६ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता योगेश तपस्वी आणि सहकारी ‘स्वामीगीत सुगंध’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यानंतर महिलांच्या हस्ते महाआरती होणार आहे. उत्सवात सर्व दिवस ‘रक्तदान महायज्ञ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

