विजेचे बटण दाबले की साधा बल्ब प्रकाशमान होतो तशीच कारखान्यातील अजस्त्र यंत्रणा देखील सुरु होते. मात्र या विजेच्या एका बटणामागे विस्तारलेली प्रचंड मोठी वीजयंत्रणा असते. या यंत्रणेत अदृश्य असलेल्या विजेला सुरळीत ठेवण्याचे कार्य प्रत्यक्षपणे करतात ते लाईनमन. जे खऱ्या अर्थाने सुरळीत वीजपुरवठ्याचे आधारस्तंभ आहेत. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. ४ मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून देशभरात साजरा करण्यात येत आहे. या लाईनमनच्या कार्यांबाबत म्हणजेच महावितरणचे जनमित्रांवर आधारित हा लेख.
वीजपुरवठा खंडित झाला की तक्रारकर्ते वीज कधी येईल याची प्रतीक्षा करतात. पण या प्रतीक्षाकाळात महावितरणचे अभियंते आणि जनमित्र यांना कोणत्या परिस्थितीत व विविध अडथळ्यांना तोंड देत रात्रीबेरात्री कशी कामे करावी लागतात याची माहिती फारशी कोणाला नसते. परंतु अभियंते आणि जनमित्र यांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वीजसेवा देण्याची धडपड आणि अविश्रांत प्रयत्न समजून घेतले तर त्यांच्या कर्तव्य बजावण्याच्या प्रयत्नांना खरा न्याय दिल्यासारखे होईल.
विजेच्या निर्मितीनंतर पारेषण, वितरण अशा टप्प्यांमध्ये ग्राहकांच्या दारापर्यंत वीजपुरवठा केला जातो. दाटवस्तीच्या महानगरापासून ते अतिदुर्गम दऱ्याखोऱ्यातील सर्व प्रकारच्या वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्रांना दक्ष राहावे लागते. वीज दिसत नाही. वीजयंत्रणेत काम करण्याचा कितीही वर्षांचा अनुभव असला तरी विजेशी मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या क्षणी अनावधानाने झालेली चूकही जीवावर बेतू शकते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री-बेरात्री अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व धोकादायक आव्हाने पेलून अभियंता व जनमित्रांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य बजवावे लागते. वीजपुरवठा खंडित झाला की तो पूर्ववत होईपर्यंतचा प्रतीक्षा काळ हा वीजग्राहकांना नकोसा असतो, एवढी विजेची गरज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात निर्माण झाली आहे.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साधारणतः उन्हाळा ते पावसाळ्यातील ८ ते ९ महिन्यांचा कालावधी अतिशय आव्हानात्मक व खडतर असतो. उन्हाचा तडाखा, तापलेली वीजयंत्रणा, वाढलेली विजेची मागणी त्यानंतर वादळे, मान्सूनपूर्व धुव्वाधार पाऊस व त्यानंतरचा पावसाळी संततधार पाऊस, पुरस्थिती अशा नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे प्रकाशदूत सज्ज असतात. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रात धडकलेले ‘निसर्ग’ व ‘तौक्ते’ चक्रीवादळे, राज्यातील विविध ठिकाणची पूरस्थिती आणि महाभयंकर कोविड-१९ च्या साथीच्या रोगामुळे वीजक्षेत्रासमोर अत्यंत कठीण परिस्थिती होती. अशाही स्थितीत महावितरणच्या प्रत्येक जनमित्राने वीजग्राहकांना प्रकाशात ठेवण्यासाठी अविरत, अविश्रांत कर्तव्य बजावले आहे.
खरे पाहता महावितरणच्या पुरुष व महिला तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांवर २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह इतर विविध ग्राहकसेवा देण्याची जबाबदारी आहे. यासोबतच थकीत वीजबिलांची वसूली करणे, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, वीजचोरीविरोधात कारवाई करणे आदी महत्वाची कामे करावी लागतात. महावितरणच्या ग्राहकसंख्येत दरवर्षी सुमारे १० लाखांची भर पडत आहे. सोबतच विजेची मागणीही सुमारे १० टक्क्यांनी वाढत आहे.
सन १९९३ मध्ये मराठवाड्यात किल्लारी परिसरात झालेला भूकंप असो की सन २००९ मध्ये कोकणात धडकलेले ‘फयान’ चक्रीवादळ असो अशा अनेक नैसर्गिक भयंकर आपत्तीमध्ये महावितरणच्या प्रकाशदूतांनी काळोखात गेलेल्या लाखो वीजग्राहकांना प्रकाशमान करण्यासाठी जीवाचे रान केले आहे. सन २०१४ मध्ये महाराष्ट्रभर झालेल्या प्रचंड गारपिटीने तर वीजयंत्रणेचे अभूतपूर्व नुकसान झाले होते. परंतु अहोरात्र काम करून ही यंत्रणा उभारण्याचे व वीजपुरवठा सुरळीत करण्याची कामगिरी प्रकाशदूतांनी यशस्वी केली. प्रसंगी महापुरात बोटीने जाऊन किंवा नदीमध्ये पोहत जाऊन वीजयंत्रणेची दुरुस्ती करण्याचे धैर्य दाखवत वीजपुरवठा सुरु करण्याचे कर्तव्य प्रकाशदूत दरवर्षी बजावतात याचा प्रत्यय अनेक जिल्ह्यांमध्ये आला आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याची जिगरबाज धडपड जशी करावी लागते तशीच धडपड दऱ्याखोऱ्यातील डोंगराळ भागात नवीन वीजजोडणी देण्यासाठी ‘प्रकाशदूतां’ना करावी लागते. केवळ महावितरणच्या ग्राहकांसाठी नव्हे तर मुंबई शहरातील सन २००६ च्या प्रलयात जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या प्रकाशदूतांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यानंतर गेल्या दोन-तीन वर्षांमधील ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ चक्रीवादळांनी जमीनदोस्त केलेली वीजयंत्रणा विक्रमी कालावधीत पूर्ववत केली. तसेच कोविड-१९ मध्ये संचारबंदीमुळे घरात असलेल्या प्रत्येक ग्राहकाला प्रकाशात ठेवण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनमित्रांनी मोठे योगदान दिले आहे.
वीज यंत्रणेचा भलामोठा पसारा असल्याने जनमित्र यांना वेळी-अवेळी, रात्र असो की दिवस, उन असो, वादळ असो की पाऊस या सर्वच परिस्थितीमध्ये खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संभाव्य धोके टाळून कर्तव्य पणाला लावावे लागते. धोकेही असे की, जाणते किंवा अजाणतेपणी झालेली चूक वीज माफ करीत नाही आणि थेट मृत्यूच्या दारात नेते. त्यामुळे अशा वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्याची कामे तसे जिकिरीचे व प्रसंगी जोखमीचे सुद्धा असते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रकाशदूतांना मानाचा मुजरा.
लेखक – निशिकांत राऊत, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण पुणे.