पुणे-,’पी.पी.पी. पद्धतीने रस्ते विकसित करण्याचे प्रस्ताव मान्य करता, मग त्याच पद्धतीने पीएमपीसाठी बस खरेदी का करीत नाही असा सवाल स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना केला आहे.
या संदर्भात तांबे यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’जानेवारी २०२१ मुख्यसभे समोरील विषय क्रमांक २०९ मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक बस जी.सी.सी मॉडेल किंवा विकत किंवा पी.पी.पी या विषयांवर २०२०-२१ च्या अंदाजपत्रकामध्ये मुख्य सभेने मान्यता दिलेल्या विषयाचे ९ कोटी रुपयाचे वर्गीकरण आपण पथावरील दिवे वीज खर्च यासाठी मुख्य सभेच्या मान्यतेसाठी ठेवले आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपण शहरातील खराडी आणि परिसरातील ६०० कोटी रुपयाचे रस्ते व पूल पी.पी.पी मॉडेलद्वारे करण्यासाठी सल्लागार नियुक्तीचे विषय पत्र स्थायी समितीमध्ये मान्य केले आहे. काही बांधकाम व्यावसायिक या पी.पी.पी मॉडेलच्या रस्त्यांसाठी आग्रही असल्याची चर्चा वर्तमानपत्र आणि महापालिकेमध्ये आहे. अशा पद्धतीने एका ठराविक भागातले रस्ते विकसित केल्यामुळे शहरातील अन्य भागांवर याचा निश्चितपणे अविकासाचा परिणाम होणार आहे. याबाबत देखील आपणास सविस्तर पत्र मी या आधी दिलेले आहे.
जानेवारी विषय क्र. २०९ नुसार शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी पी.पी.पी या पद्धतीने विषयाला मुख्य सभेने याआधीच मान्यता दिलेली आहे. पी.पी.पी मॉडेलद्वारे बस खरेदी केल्यास सामान्य पुणेकरांना जे रोज पी.एम.पी.एम.एल या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात त्यांना अधिक चांगली सुविधा देण्यास निश्चित मदत झाली असती. पण बांधकाम व्यावसायिकांसाठी एक न्याय आणि सामान्य पुणेकरांसाठी वेगळा न्याय असा दुजाभाव महापालिका प्रशासन व सत्ताधारी का करते याचे उत्तर आपण द्याल अशी अपेक्षा आहे.त्यामुळे जानेवारी मुख्यसभा विषय क्र.२०९ हा रद्द करण्यात यावा, आणि सामान्य पुणेकरांचा हिताचा विचार करून शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात यावा ही विनंती. ज्यामुळे सामान्य पुणेकरांना अधिक चांगली सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण होईल,यालाच जास्त प्राधान्य देणे हे गरजेचे आहे. याबाबत आपण सकारात्मक विचार कराल अशी विनंती.
असेही नगरसेवक विशाल तांबे यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.