- हर्षवर्धन पवारची भेदक गोलंदाजी; सुरज गोंड व यश जगदाळे यांची अर्धशतकी खेळी
पुणे, 3 मार्च 2021: व्हिजन क्रिकेट अकादमी यांच्या वतीने व संतोष मते परिवाराच्या सहकार्याने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने अचूक गोलंदाजी करत 22 यार्डस संघाला 150 धावांवर रोखले व त्यानंतर सुरज गोंड(66धावा) व यश जगदाळे(62धावा) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या दिवशी 62 धावांची आघाडी घेत वर्चस्व राखले.
व्हिजन स्पोर्ट्स सेंटर, सिंहगड रोड येथील मैदानावर सुरु असलेल्या तीन दिवसीय लढतीच्या सामन्यात आज पहिल्या दिवशी 22 यार्डस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. व्हेरॉक संघाच्या हर्षवर्धन पवार(50-4), तनु गोटीपटी(9-2), नारायण चौधरी(19-1), टिळक जाधव (8-1), रोहित चौधरी(13-1) यांच्या अचूक माऱ्यापुढे 22 यार्डस संघाचा डाव 38षटकात 150 धावावर कोसळला. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर प्रज्ञेश बराटेने 42चेंडूत 7चौकार व 1षटकाराच्या मदतीने 41धावा, श्रेयस केळकरने 22धावा, राकेश मतेने 10धावा, आर्शीन देशमुखने 10 धावा काढून थोडासा प्रतिकार केला.
याच्या उत्तरात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने आजदिवस अखेर 41 षटकात 5बाद 212धावा केल्या. वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे व्हेरॉक संघ 7.5षटकात 3बाद 35धावा असा अडचणीत आला. यानंतर फलंदाजीस आलेल्या सुरज गोंड याने संयमी खेळी करत 86 चेंडूत 12चौकारांच्या मदतीने 66 धावा केल्या. सूरजला यश जगदाळेने 62 चेंडूत 8चौकार व 2 षटकारांसह 53 धावांची खेळी करून सुरेख साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 111चेंडूत 115धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. सूरज आणि यश झेलबाद झाल्यावर टिळक जाधव नाबाद 32धावा व ओंकार राजपूत नाबाद 10 धावा करत संघाला 62 धावांची आघाडी मिळवून दिली. 22 यार्डसकडून प्रज्ञेश बराटेने 38धावात 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक:पहिला डाव: 22 यार्डस: 38षटकात सर्वबाद 150 धावा(प्रज्ञेश बराटे 41(42,7×4,1×6), श्रेयस केळकर 22(43,4×4), राकेश मते 10, आर्शीन देशमुख 10, हर्षवर्धन पवार 13-50-4, तनु गोटीपटी 4-9-2, नारायण चौधरी 4-19-1, टिळक जाधव 5-8-1, रोहित चौधरी 5-13-1) वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 41षटकात 5बाद 212धावा(सुरज गोंड 66(86,12×4), यश जगदाळे 62(53,8×4,2×6), जयेश पोळ 20 टिळक जाधव नाबाद 32(51,5×4), ओंकार राजपूत नाबाद 10, प्रज्ञेश बराटे 8-38-2, नितेश सालेकर 12-42-1, अमन मुल्ला 4-28-1); पहिल्या डावात व्हेरॉक संघाकडे 62 धावांची आघाडी;