पुणे : शहरासह जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 444 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 71 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 373 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
शहरातील आठ मतदारसंघात 208 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यात 43 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सर्वाधिक 27 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 85 उमेदवारी दाखल झाले होते. त्यापैकी 58 अर्ज वैध झाले असून, 27 अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती पुणे कँटोन्मेंट मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी नीता शिंदे यांनी दिली.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मुख्य राजकीय पक्षाचे उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.त्यामध्ये कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे रमेश बागवे,,भाजपचे सुनील कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण आरडे, एमआयएमच्या हिना मोमीन, आम आदमी पार्टीचे खेमदेव सोनवणे, मनसेच्या मनिषा सरोदे, बहुजन मुक्ती पार्टीचे हुलगेश चलवादी यांच्यासह बंडखोरी केलेले काँग्रेसचे सदानंद शेट्टी, भाजपचे बंडखोर उमेदवार भरत वैरागे, शिवसेनेच्या बंडखोर पल्लवी जावळे यांच्यासह उर्वरित अपक्षांचे अर्ज वैध ठरले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी कसबा पेठ मतदारसंघातील इच्छुक उमेदवार नरेंद्र पावटेकर या अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरविण्यात आला त्यांचे वय 25 वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे अर्ज बाद ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात एकूण 15 उमेदवारांनी 19 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोन उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. त्यामुळे 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार फैय्याज मुश्ताक सय्यद राज यांच्या एबी फॉर्मवर पांढऱ्या शाईने खाडाखोड आणि एकच प्रस्तावक असल्याच्या कारणास्तव तो अर्ज नामंजूर करण्यात आला