शिरवळ : ‘उदय गुजर फाउंडेशन’च्या ‘कौशल्य विकास केंद्रा’चे उद्घाटन प्रख्यात वैज्ञानिक आणि पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. सातारा जिल्ह्यातील शिरवळमधील विंग या गावी झालेल्या या कार्यक्रमात ‘उदय गुजर फाउंडेशन’चे संचालक उदय गुजर, उर्मिला गुजर, पूरब गुजर, पूर्वा गुजर व व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेडचे अध्यक्ष आर. वासुदेवन उपस्थित होते. प्रख्यात शास्त्रीय गायक महेश काळे, माणदेशी महिला बँकेच्या संस्थापिका व अध्यक्षा चेतना सिन्हा, ज्येष्ठ शिक्षक शंकरराव गाढवे आणि भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्न देशमुख हे या प्रसंगी प्रमुख पाहुणे होते. परिसरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते.
हे कौशल्य विकास केंद्र 5 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. येथे विद्यार्थ्यांना टॅली ईआरपी9 (जीएसटीसहीत), स्पोकन इंग्लिश व संज्ञापन, प्रवास व पर्यटन, वाहन चालन, तसेच कार्यालयीन सहाय्य आणि करिअर समुपदेशन यांचेे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुलींसाठी येथे वसतिगृहाची सोय असून त्यात 100 मुलींची सोय होऊ शकते. त्या विद्यार्थिनींना या केंद्रात निवासी प्रशिक्षण दिले जाईल. ‘ना नफा’ या तत्वावर चालविण्यात येणार्या या कौशल्य विकास केंद्राने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माणदेशी महिला बँकेशी करार केला आहे.
शिक्षणाची गरज आणि महत्त्व यावर आपल्या भाषणात भर देताना डॉ. रघुनाथ माशेलकर या प्रसंगी म्हणाले, “मुलांमध्ये उच्च आकांक्षा असणे आवश्यक आहे. आपण जे काही करीत आहोत, त्यावर आपले पूर्णपणे लक्ष केंद्रित हवे. उत्कृष्टतेची शिडी चढण्यासाठी खरेतर कोणतीही मर्यादा नसते. आपण नेहमी वेगळा विचार करायला हवा. एखाद्या संधीचा दरवाजा उघडला नाही, तर कोणी निराश होऊ नये, उलटपक्षी जीवनात यश मिळवण्यासाठी विविध संधी शोधत राहायला हव्यात.“
उदय गुजर फाउंडेशनचे संस्थापक–संचालक उदय गुजर म्हणाले, “ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण पूर्ण केल्यावर शहरांमध्ये नोकरी मिळणे कठीण असतेे. याचे कारण त्यांच्याकडे मूलभूत संज्ञापन व इतर कौशल्यांचा अभाव असतो. हे लक्षात घेऊन हे केंद्र मुला-मुलींना मूलभूत कौशल्ये देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे, ज्यायोगे मुलांना रोजगार मिळू शकेल आणि त्यांना उत्पन्नाचे साधन मिळेल.”
गुजर पुढे म्हणाले की, अनेक पालक मुलींना पुढील प्रशिक्षण घेण्यासाठी शहरांत पाठविण्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव टाळाटाळ करीत असतात. त्यांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी या केंद्रात मुलींसाठी वसतिगृहाची सुविधा उभी करण्यात आली आहे. विंग आणि जवळपासच्या गावांतील अधिकाधिक मुलींना या केंद्राचा फायदा होईल, अशी आशा आहे.
या उपक्रमाला पाठिंबा व मदत देणार्या नागरिकांचे व संस्थांचे गुजर यांनी आभार मानले.
‘व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि.’चे अध्यक्ष आणि उदय गुजर फाउंडेशनचे संचालक वासुदेवन म्हणाले, “या कौशल्य विकास केंद्राच्या पायाभरणीपासूनच त्याचा एक भाग होता आले, याचा मला खूप आनंद आहे. यापुढेही गरजू व विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या आयुष्यात बदल घडविणार्या उपक्रमांना माझे पाठबळ कायम राहील.”
महेश काळे, चेतना सिन्हा, शंकरराव गाढवे, डॉ. प्रसन्न देशमुख, पूरब गुजर आणि पूर्वा गुर्जर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या दृष्टिकोनाची प्रेरणा दिली. उर्मिला गुजर यांनी सर्वांचे आभार मानले.