पुणे : पुण्यातील वडगाव पुलावर मोठा अपघात घडला आहे. मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक उड्डाणपुलावर ब्रेक फेल झालेल्या ट्रक ने समोर असलेल्या दहा ते बारा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात पोलिसांच्या वाहनाचा देखील समावेश आहे.हा अपघात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला असून या अपघातात काही जण किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाल्याचे पाहयला मिळाले. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून अहमदाबादकडे कपडे घेऊन निघालेला ट्रक वडगाव बुद्रुक येथील पुलावरून खाली येत होता. यावेळी ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.दरम्यान सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी होती. यात १० ते १२ चारचाकी वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र ग्रामीण पोलिसांच्या वाहनाचेही या अपघातात मोठे नुकसान झाले आहे.अपघाताचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, वारजे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल पवार, पोलीस उपनिरीक्षक मुकेश कुरेवाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.