पुणे-खरे तर चोर, दरोडेखोर पकडायला लावलेले सीसी टीव्ही कॅमेरे प्रत्यक्षात प्रामुख्याने दुचाकीस्वारांनाच लक्ष्य करून टिपून त्यांचे खिसे खाली करू लागल्याची अवस्था असताना आता चौकात उभे राहून वाहतूक नियोजन विसरलेले पोलीस, चौकाच्या पलीकडे उभे राहून सावज धरपकड करताना दिसतात. पण यासाठी उभे राहावे लागते अगदी साहेबांपासून ते शिपायांपर्यंत सर्वानांच.. पण आता किमान साहेबांना तरी उभे राहायाला नको म्हणून चक्क अतिक्रमण करून रस्त्याच्या पदपथावरच ऑफिस थाटण्याचा प्रकार सातारा रस्त्यावर होत असल्याचा प्रकार राष्ट्रवादीच्या जागरूक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणून महापालिकेला संबधित अतिक्रमण काढण्याची विनंती केली आहे. आता हे अतिक्रमण काढणे त्यासाठी केलेला खर्च वसूल करणे आणि अतिक्रमण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करणे या बाबी करणार तरी कोण ? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
सातारा रस्त्यावर वाळवेकर लोन्स नजीक ट्राफिक पोलीस लोकांच्या घरांसमोर अतिक्रमण करून टपरीवजा ऑफिस थाटत आहेत. अजित पवारांनी दंड भरला, वळसे पाटलांनी दंड भरला तुम्ही कोण आहात ? असे सवाल करत पुण्यातील दुचाकी चालकांकडून आज जोरात वसुली सुरु असताना या अतिक्रमणाकडे लक्ष जाताच कार्यकर्त्यांनी याबाबत तक्रार केली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेरीस महापालिकेच्या अतिक्रमण प्रमुख माधव जगताप यांच्याकडे फोनवर तक्रार केल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. या ठिकाणी देखरेख करत असलेल्या पोलीस कर्मचारी यांना आपण येथे काय करत आहात? आणि त्याची परवानगी घेतली आहे का? असे विचारले असता त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे बोट दाखविले. असेही या कार्यकर्त्यांनी सांगितले.