पुणे–केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात पुणे शहर काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. सोमवारी (दि. २९) सकाळी १०.३० वा. साहित्यसम्राट न. चि. केळकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली.
आधीच कोरोना – लॉकडाऊन ने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अनेक व्यावसायिक,नौकार्दारांनी आत्महत्या करण्याच्या घटना घडत आहेत त्यात मागील २ महिन्यापासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. या दरवाढीचा महागाईवर परिणाम झाला आहे.कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन असताना महागाई मात्र सातत्याने वाढती आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलायला तयार नाहीत. पेट्रोल-डिझेल दर कमी करावे, या मागणीसाठी प्रामुख्याने हे आंदोलन करण्यात येणार आहे.
त्यासाठी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रमेश बागवे यांनी केले आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून काँग्रेस केंद्र सरकार विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.चीनच्या वाढत्या दादागिरी विरोधात त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहे. तर, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सातत्याने होत असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सोमवारी आंदोलन होणार आहे. त्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.