पुणे- आंतरराष्ट्रीय पातळीवर पेट्रोल डिझेलचे दरात प्रचंड घसरण होत असताना दुसरीकडे कोरोनाने आधीच हैराण,आणि कमजोर झालेल्या जनतेची लुट पेट्रोल डिझेलची सातत्याने दरवाढ करून करणे म्हणजे हा तर केंद्र सरकारने घरोघरी टाकलेला दरोडा च आहे अशा शब्दात आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर हल्ला चढविला .पेट्रोल व डिझेलची दरवाढ सातत्याने सुरू आहे. या विरोधात काँग्रेसने आज राज्यभर आक्रमक पवित्रा घेत आंदोलनास सुरूवात केली आहे. पुण्यात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. शहर अध्यक्ष, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर,दीप्ती चवधरी ,कमल व्यवहारे ,गोपाळ तिवारी ,बाळासाहेब अमराळे ,मुक्तार शेख ,सचिन आडेकर ,नीता परदेशी ,मोहन जोशी ,अभय छाजेड ,उल्हास पवार ,चंद्रशेखर कपोते ,तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची याप्रसंगी मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. बाळासाहेब थोरात यावेळी पुढे म्हणाले की, आपल्या सर्वांवर करोना विषाणुचे एवढे मोठे संकट असताना. प्रत्येक राज्य त्याला सामोरे जात आहे. मात्र त्याच दरम्यान केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ करून सर्व सामन्याचे कंबरडे मोडत आहे. याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करीत असून, सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.