पुणे-येत्या ४८ तासांत, नंदुरबार,धुळे जळगाव,नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता असून पुणे,अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट येण्याची दाट शक्यता पुण्याच्या वेधशाळेने वर्तविली आहे, त्याच बरोबर औरंगाबाद,जालना, परभणी,बीड,हिंगोली,नांदेड,लातूर,उस्मानाबाद विदर्भतील काही भागात देखील थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेचे प्रमुख के एस होसलीकर यांनी म्हटले आहे.
आज सकाळी १० वाजता नोंदविले गेलेले तापमान –
पुणे ८.६, बारामती ९.७ औरंगाबाद 5.7 नांदेड 10.2, परभणी 9.5 सोलापूर १२ जळगाव 5 सांगली 13.1, महाबळेश्वर 11.1, कोल्हापूर 15 सातारा 11.9 उदगीर 10.3 रत्नागिरी 19.5, हरणई 21 नाशिक ८.७ डहाणू 17.3 मालेगाव १२.४ जालना 11 उस्मानाबाद 8.5 मुंबई- 19.4 माथेरान १६.२ ठाणे 21
गोंदीयात मोसमातील सर्वात कमी तापमान
उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे थंडी परतली आहे. गारठवणाऱ्या थंडीमुळे परत शेकोट्या पेटल्या आहे. गोंदीयात रविवारी या मोसमातील किमान 7.00 अंश सेल्सियस या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. तर नागपुरात किमान 8.5 अंश सेल्सियस इतके कमी तापमान नोंदवण्यात आले. विदर्भातील तापमानात सरासरी 2 अंशाने घट झाल्याने थंडीने गारठून गेले आहे. मात्र ही थंडी 31 जानेवारीपर्यत राहील. त्या नंतर पूर्वेकडून तसेच दक्षिण-पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडी कमी होत जाईल, असे प्रादेशिक हवामान केंद्राच्या सूत्रांनी सांगितले.
दोन अंशांनी घट
पाऱ्यात कमालीची घसरण झाल्यामुळे विदर्भ गारठला आहे. विदर्भात सरासरी 2 अंशाने पारा घसरल्याने थंडीने उसळी मारली आहे. थंडी वाढल्याने स्वेटर, मफलर, कानटोप्या, हातमोजे, जर्कीन घातल्याशिवाय लोक बाहेर निघत नाहीत. सायंकाळी 5 नंतर अंधारायला होते आणि थंडीमुळे गारठायला होते. बोचऱ्या वाऱ्यांमुळे दिवसा ऊन असले तरी गारठायला होते. विदर्भातील तापमानात सातत्याने घट होत असून पुढील पाच दिवस पूर्व उत्तर विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यासह अभ्यासकांनी दिला आहे. अवघ्या 24 तासात किमान तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे.
नागपुरही गारठले
उपराजधानी नागपुरात आठ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून गोंदियात सर्वाधिक कमी 6.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर विदर्भातील जवळजवळ सर्वच शहरात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.
विदर्भातील तापमानाची नोंद
अकोला 10.4, अमरावती 9.9, बुलढाणा 10.0, ब्रम्हपुरी 10.4, चंद्रपूर 10.4, गडचिरोली 9.6, वर्धा 9.9, यवतमाळ 8.5 व वाशिम येथे 11.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.