पुणे : शिवराज्याभिषेकाचे महत्व आपण जाणून घेतले पाहिजे, कारण असंख्य शतकांनंतर हिंदूंचे सिंहासन रायगडावर निर्माण झाले…. अशा शब्दांत लोकमान्य टिळकांनी स्वराज्य व स्वातंत्र्यप्राप्तीकरिता चेतना जागविणारे केलेले भाषण आणि घ्यावे लागतसे शिवाजी बाजी परी हे मस्तक हातावरी, हे जाणोनी तरी आता सुजनहो घ्या खड््ग ढाला हाती… अशा शब्दांत चापेकर बंधूंनी सादर केलेले काव्य पुणेकरांनी प्रत्यक्षपणे अनुभविले. तब्बल १२५ वर्षांपूर्वी प्रमाणे स्वातंत्र्यवीरांच्या वेशात कलाकारांनी सहभागी होत ऐतिहासिक अशा लकडी पूल विठ्ठल मंदिरातील शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम पुन्हा एकदा नाटयरुपाने सादर केला. तो प्रसंग पाहताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
दिनांक १२ जून १८९७ रोजी पुण्यातील लकडी पूल विठ्ठल मंदिरात शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम झाला होता. यास लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चापेकर बंधू उपस्थित होते. चापेकरांनी स्वरचित काव्याचे गायन केले होते व टिळकांनी शिवचरित्राचे महत्व सांगितले होते, ही सभा ऐतिहासिक ठरली. त्याच सभेचे इतिहास प्रेमी मंडळातर्फे त्याच मंदिरात नाटयरुपाने १२५ वर्षांनी पुन्हा एकदा सादरीकरण केले. यावेळी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप काळभोर, दीपक थोरात, दिलीप बांदल, बाळासाहेब ताटे, महेश अंबिके उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी शिवजयंती प्रमाणे शिवराज्याभिषेक दिन देखील मोठया जल्लोषात साजरा करण्याची प्रेरणा दिली. लकडी पूल विठ्ठल मंदिरात शिवराज्याभिषेकानिमित्त झालेली सभा ऐतिहासिक ठरली. त्यातून प्रेरणा घेत चापेकरांनी अवघ्या १० दिवसांनी २२ जून १८९७ ला प्लेग कमिशनर रँड चा वध केला. चापेकरांना फाशी झाली, तर टिळकांना या सभेतील भाषणामुळे शिक्षा झाली होती. त्यामुळे या ऐतिहासिक प्रसंगाचे पुन्हा एकदा सादरीकरण करुन स्वातंत्र्यवीरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन यावेळी केले. इतिहास प्रेमी मंडळातर्फे लोकमान्य टिळकांची भूमिका अॅड. अभिजीत देशमुख, दामोदर चापेकर यांची भूमिका भूषण पाठक, यांसह कुणाल कांबळे, कार्तिक बहिरट, राज दिक्षीत, पायस पारखे यांनी भूमिका साकारल्या.
