पुणे, ता. ६ : समाजाच्या गरजा ओळखून नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची निर्मिती आणि पारदर्शक परीक्षा पद्धती विकसित करण्यासाठी महाविद्यालयांनी स्वायत्ततेचा उपयोग करावा असे मत खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे (डीईएस) बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि राष्ट्रीय शिक्षा आयोग (रुसा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या ऑनलाइन राज्यस्तरीय ‘फॅक्ल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’चे उद्घाटन करताना डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते.
डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, रुसा महाराष्ट्रचे पदाधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. प्रमोद पाबरेकर, बीएमसीसीच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थांनी आपली भूमिका ठरवली पाहिजे. भारतीय ज्ञान आणि परंपरांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी अध्यापनासाठी अनौपचारिक पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करावी ज्यामुळे शिक्षण प्रक्रियेतील अस्सलपणा आणि स्वामित्वभाव टिकवता येईल.’
स्वायत्त महाविद्यालयांनी गुणवत्ता वाढीसाठी करायच्या उपाययोजना, प्रत्येक घटकाची गुणवत्ता वाढीमध्ये भूमिका, त्यासाठी आवश्यक कार्यपद्धती आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या हस्ते कार्यशाळेचा समारोप झाला. डॉ. बी. डी. भोळे, डॉ. दीपक ननावरे, डॉ. पद्मा शारंगपाणी, डॉ. संगीता जोशी, डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ४३० प्राध्यापकांनी सहभाग घेतला.