पुणे : महापालिकेतील २ मुख्य पदाधिकाऱ्यांच्या भेदभावी आणि निष्काळजीपणाच्या स्वभावामुळे यंदापासून पुण्यातील लक्ष्मी रस्त्याने जाणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रथाच्या उंचीला लगाम नाही तर उलट ठेंगणी करूनच पुढे मार्गस्थ व्हावे लागणार आहे.भाजपा प्रेमात दंग असलेल्या गणेश मंडळांनी वेळीच केलेले हे दुर्लक्ष आता यापुढे कायमस्वरूपी विसर्जन मिरवणुकीतील रथांच्या उंचीला मर्यादा ठेवणारे ठरणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आता संभाजी पुलावरून मार्गस्थ होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूक रथाला २१ फुटाच्या आतच आपली उंची साकरावी लागणार आहे.जेणे करून आजतागायत येथून २५ फुटावरून जास्त उंचीचे रथ हि मार्गस्थ होत होते.मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळाची गणेशमूर्ती १४ फूट उंच असून, त्यांची विसर्जन रथावरची सजावट २५ फुटांपर्यंत जात असते. यंदाच्या वर्षी राज्य सरकारने निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे दाेन वर्षांनंतर साजऱ्या हाेणाऱ्या या गणेशाेत्सवात विसर्जन मिरवणूकही वैशिष्ट्यपूर्ण राहणार, हे निश्चित झाले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत आकर्षक विसर्जन रथ गणेश मंडळे करीत असतात.
वनाज ते रामवाडी हा मेट्राे मार्ग संभाजी पुलावरून जात आहे. या मार्गाचा आराखडा तयार करताना संभाजी पुलावरून मार्गस्थ हाेणाऱ्या विसर्जन मिरणुकीतील सहभागी रथांच्या उंचीचा विचार केला गेला नाही. या पुलाचे बांधकाम सुरू असताना काही गणेश मंडळांनी विरोध केला हाेता.त्या गणेश मंडळांकडून महापालिकेत या विषयावर आंदोलनही केले होते; परंतु अखेर आता उशीर झाला आता मेट्रो पुलाचा आराखडा बदलता येत नसल्याचे सांगून हा विषय मागे पडला गेला. या काळात मेट्रो पुलाचे काम याठिकाणी पूर्ण होऊन पुढील कार्यवाही सुरू झालेली आहे.
विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या पुढाकाराने, सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सुनील रासणे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, नितीन पंडित, दत्ताभाऊ कावरे, विनायक कदम, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे संजीव जावळे, बाबा डफळ, अखिल मंडई मंडळाचे विश्वास भोर, संकेत मते व मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी करून उंचीची मोजणी केली. यात संभाजी पुलावरील रस्ता व मेट्राेचा पूल यांच्यातील अंतर एकवीस फूट असल्याचे स्पष्ट झाले आहे.