सुनील माने यांचे सहआयुक्तांना निवेदन
पुणे ता. १९ (प्रतिनिधी) : औंध –बाणेर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या औंध, बाणेर, बालेवाडी,बोपोडी, चिखलवाडी, औंधरोड येथे सध्या डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी विनंती आज भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त श्री संदीप खलाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत खडकी युवा मोर्चा अध्यक्ष अजित पवार, स्वप्नील कांबळे, अनिल माने आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात अद्यापही पाऊस सुरू आहे. पावसाचे पाणी सर्वत्र साठून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे औंध –बाणेर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या औंध, बाणेर, बालेवाडी,बोपोडी, चिखलवाडी, औंधरोड येथे सध्या डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे नागरिक प्रचंड त्रासले आहेत.
नागरिकांचे स्वास्थ बिघडल्याने महानगरपालिका,शासकीय रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयात गर्दी वाढली आहे. नागरिक मोठ्या संख्येने डेंगीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या रुग्णालयात डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या साथरुग्णांवरील औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी.
तसेच क्षेत्रीय कार्यालयामार्फत आपण औषध फवारणी, वस्ती पातळीवर धूर फवारणी यासारख्या उपाययोजना कराव्यात तसेच वस्तीमधील ड्रेनेज लाईनची स्वच्छता, जनजागृती, याप्रमाणेच डास उत्पत्ती ठिकाणे शोधून ती नष्ट करणे, डासांची उत्पत्तीसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणे आदी उपाय योजना तातडीने कराव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे.